मालाडमध्ये ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी बांगूरनमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुरेश पुजारी उर्फ सुर्या मालाडमधील तृतीयपंथ समुदायाचे प्रमुख होते. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास मालामधील रुमानिया हॉटेलजवळून जात असताना काही अज्ञात त्यांच्याकडे आले आणि हल्ला केली अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

हल्ल्यानंतर सूर्या यांनी आरोपींसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी एका आरोपीने चाकू काढून त्यांच्या मानेवर वार केला. सूर्या मदतीसाठी ओरडत असल्याने तेथे उपस्थित लोकांनी धाव घेतली. यानतंर आरोपींनी तेथून पळ काढला.

बापरे! हत्या केल्यानंतर ह्रदय शिजवलं आणि कुटुंबाला जेवायला वाढलं

हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्या यांनी स्थानिकांनी रुग्णालयात नेलं तसंच पोलिसांनाही फोन करुन घटनेची माहिती दिली. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सूर्या यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. सूर्या यांची सोन्याची चेन आणि पाकिट यांना आरोपींनी हात लावला नसल्याने हत्या हाच मुख्य उद्धेश होता असं प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

“ही पूर्वनियोजित हत्या असावी कारण आरोपींना सूर्या यांच्या दैनंदिनीबद्दल माहिती होती. आम्ही सध्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करत असून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांचा जबाब नोंदवत आहोत. सध्या तरी आम्हाला तीन मारेकरी होते इतकीच माहिती मिळाली आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.