रस्ते अपघातातील जखमींवर पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो हे लक्षात घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव टोलनाक्याच्या बाजूला ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले असून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.  राज्यात वर्षांकाठी सुमारे ३० हजार अपघात होत असून यामध्ये २०१८ मध्ये १३,५६० जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभाग, एमएसआरडीसी, एसजी डायग्नोस्टिक आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरसाठी हॉटलाइन क्रमांकही देण्यात येणार असून येथे छोटे शस्त्रक्रिया गृह, तज्ज्ञ डॉक्टर, कार्डिअक रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात आली आहे.