विकासाच्या विविध कामांचे लेबल लावत महापालिकेने २०१४ ते २०१६ या तीन वर्षांत तब्बल २१ हजार झाडे मुळापासून उखडण्याची परवानगी दिली. माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने या तीन वर्षांत ७,८४२ झाडे कापण्यासाठी परवानगी दिली, तर १३ हजार ७० झाडे पुनरेपित करण्यास सांगितली. मात्र पुनरेपित झाडे नेमकी कुठे लावली व त्यातील किती झाडे जगली याची माहिती पालिकेकडे नाही. दर पावसाळ्यात वाऱ्यामुळे पडणाऱ्या सरासरी एक हजार झाडांची संख्या लक्षात घेतली तर तीन वर्षांत दिवसाला २२ झाडे शहरातून नामशेष झाली आहेत.

राज्य सरकारचा वन विभाग चार कोटी झाडे लावण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई महापालिका मात्र याला परस्पर विरोधी कार्य करत आहे. माहिती अधिकार कार्यकत्रे अनिल गलगली यांनी पालिकेच्या उद्यान खात्याकडे गेल्या तीन वर्षांत झाडे कापण्यासाठी दिलेल्या परवानगीची माहिती मागविली होती. यावर उद्यान उपअधीक्षकांनी पुरवलेल्या माहितीनुसार २०१४, २०१५ व २०१६ या वर्षांत विविध कारणांसाठी कापल्या गेलेल्या, पुनरेपित केलेल्या आणि संवर्धन केल्या गेलेल्या झाडांची माहिती समोर आली आहे. यानुसार या तीन वर्षांत ७, ८४२ झाडे कापली गेली आहेत. तर १३ हजार ७० झाडे पुनरेपित करण्यात आली असून २८ हजार  ७८७ झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. या सगळ्या आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी सात झाडे कापण्याची परवानगी पालिका देत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. तसेच तीन वर्षांतील सर्वाधिक वृक्षतोड २०१६ यावर्षी करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात खासगी जमिनीवरील १ हजार ८३० झाडे, सरकारी जमिनीवरील १ हजार ४४८ झाडे आणि विविध कामांसाठी २ हजार ५४१ झाडे अशी मिळून ३ हजार ८१९ झाडे गेल्या वर्षी पालिकेने कापली आहेत. शिवाय २०१५ या वर्षांत २ हजार ७२० झाडे व २०१४ यावर्षी १ हजार ३०३ झाडांची तोड झाली आहे. या तीनही वर्षांत १३ हजार ७० झाडांचे पुनरेपण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु पुनरेपणाचा दावा पालिकेने केला असला तरी, किती झाडे पुनरेपित झाली आहेत आणि त्यापैकी केवढी जगली आहेत यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे कापली गेलेली झाडे आणि पुनरेपित केलेली झाडे अशा मिळून २० हजार ९१२ झांडाचे उच्छाटन या तीन वर्षांत पालिकेने केले आहे.