माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या पनवेल येथील ‘हेक्स वर्ल्ड’ या १६० कोटी रुपये किमतीच्या भूखंडावर सक्तवसुली महासंचालनालयाने अखेर टाच आणली आहे. ‘हेक्स वर्ल्ड’चा हा भूखंड नवी मुंबई येथील खारघर परिसरात आहे.
महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणांत भुजबळ कुटुंबीयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात लाच घेतली गेली. यापकी मोठी रक्कम परदेशात असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आली, असा आरोप असल्यामुळे सक्तवसुली महासंचालनालयामार्फत चौकशी सुरू करण्यात आली.
समीर व पंकज भुजबळ हे संचालक असलेल्या देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे पनवेल येथे ‘हेक्स वर्ल्ड’ हा गृहप्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सदन व इतर घोटाळ्यांतून मिळालेली लाच वापरली गेली, असा आरोप आहे. समीर भुजबळ यांनी याचा इन्कार केला आहे. या प्रकरणी सक्तवसुली महासंचालनालयाने समीर व पंकज या दोघांना चौकशीसाठी बोलाविले होते व प्रश्नावलीही पाठविली होती; परंतु दोघांनी वेळ मागून घेतला होता. सक्तवसुली महासंचालनालयाने बऱ्याच कंपन्यांची माहिती मागविल्यामुळे वेळ मागून घेतली होती, असे स्पष्टीकरण समीर भुजबळ यांनी केले आहे.
१५ सप्टेंबर रोजी सक्तवसुली महासंचालनालयाने छगन भुजबळ यांच्याविरोधात ‘फेमा’अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भूखंडावर टाच आणण्याची ही कारवाई झाली आहे.