टीआरपी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पाच गुंतवणूकदारांना समन्स जारी करून चौकशीस बोलावले आहे. यातील चार गुंतवणूकदार कंपन्यांची मुख्यालये कोलकात्यात आहेत.

घोटाळ्यातील संशयित वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने ‘फॉरेन्सिक ऑडिट’ सुरू केले आहे. रिपब्लिक वहिनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने गुंतवणूकदारांकडे चौकशी केली जाणार आहे, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने संगितले.

आरपीजी पॉवर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रिव्हल सिस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत. आरपीजी कंपनीने १० कोटी रुपयांची, तर अनंत उद्योग एलएलपीने ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक रिपब्लिक वाहिनीत केली आहे.

घोटाळ्याच्या तपासासाठी कोलकाता येथे गेलेल्या पथकाने या पाच कंपन्यांच्या संचालकांना समन्स जारी केले.

यापैकी दोन कंपन्यांच्या संचालकांना ३० ऑक्टोबरला चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. तसेच गुंतवणूकदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांमध्ये शोधाशोध केली, असा दावा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने केला.

तक्रारदार कंपनीशी रिपब्लिकचे आर्थिक व्यवहार!

*  टीआरपी घोटाळ्यातील तक्रारदार ‘हंसा रिसर्च ग्रुप’ आणि घोटाळ्यात सहभाग स्पष्ट झालेली रिपब्लिक वाहिनी यांच्यातील आर्थिक व्यवहार उघड झाल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे.

*  हंसा कंपनीने रिपब्लिक वाहिनीच्या बँक खात्यात एकरकमी ३२ लाख रुपये जमा केल्याची माहिती फॉरेन्सिक ऑडिटदरम्यान पुढे आली. या महितीस विशेष पथकाचे प्रमुख सचिन वाझे यांनी दुजोरा दिला.

*  टीआरपी मोजण्यासाठी ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च सेंटर’ने(बीएआरसी) ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमीटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी  हंसा कंपनीची नियुक्ती केली होती. मात्र रिपब्लिकसोबतच्या आर्थिक व्यवहारांबाबत हंसाने बीएआरसीला अंधारात ठेवले. याबाबत गुन्हे शाखेने हंसाचे संचालक नरसिंहन कृष्णस्वामी यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी या व्यवहाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. ल्ल  घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडे आणि रामजी वर्मा यांच्यात मोबाइलद्वारे घडलेले ४५ मिनिटांचे संभाषण गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. त्यात अभिषेक ग्राहकांना कसे फिरवावे याबाबत सूचना देत आहे.