मोटार अपघात दावा लवादाचे ट्रकमालक, विमा कंपनीला आदेश

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ट्रकचे चाक डाव्या पायावरून गेल्याने तीन बोटे गमवाव्या लागणाऱ्या ६९ वर्षांच्या कामगाराला ५.१२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा लवादाने ट्रकचा मालक आणि विमा कंपनीला दिले आहेत.

तीन वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये अब्दुल खान हे वाशी येथील एपीएमसी बाजारातील रस्त्यावरून चालत असताना एक ट्रकचालक ट्रक मागे घेत होता. त्यात खान यांच्या डाव्या पायावरून ट्रकचे चाक गेले. अपघातानंतर ट्रकचा चालक पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

खान यांनी नुकसानभरपाईसाठी लवादाकडे दावा केला होता. मात्र ट्रकचा मालक लवादापुढे हजर झालाच नाही, तर विमा कंपनीने आरोप मान्य करण्यास नकार दिला. याउलट अपघात घडला त्या वेळी ट्रकच्या चालकाकडे वैध परवाना नव्हता. त्यामुळे विम्याच्या अटींचे उल्लंघन करण्यात आले, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला. एवढेच नव्हे, तर या अपघातामुळे खान यांना अपंगत्त्व आल्याचेही कंपनीने अमान्य केले.

अपघातानंतर खान हे दोन महिने रुग्णालयात होते. त्यांना ८१ हजार रुपये उपचारखर्च आला. खान यांच्यातर्फे डॉक्टरची साक्ष नोंदवण्यात आली. खान यांना अपघातानंतर उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या डाव्या पायांच्या बोटांना गंभीर दुखापत झाल्याचे तपासणीत आढळून आले. डाव्या पायाची तीन बोटे तर कापावी लागली. खान यांना खूप वेळ बसता, उभे राहता वा चालणेही शक्य नाही. या अपघातामुळे खान यांना ६५ टक्के े कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचेही डॉक्टरने लवादाला सांगितले. मात्र खान यांच्यावर आपण उपचार केलेले नाहीत, तर आपण त्यांच्या वैद्यकीय अहवालावरून त्यांना किती अपंगव आले हे विशद केल्याचे डॉक्टरने उलटतपासणीच्या वेळी स्पष्ट केले.

ट्रकचालकाचे म्हणणे फेटाळले

ट्रकच्या चालकाचीही बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवण्यात आली. अपघातानंतर जमलेला जमाव मारहाण करेल या भीतीने आपण घटनास्थळावरून पळून गेल्याचा दावा त्याने केला. त्याने आपला चालक परवानाही लवादासमोर सादर केला. त्याच आधारे लवादाने विमा कंपनीचे नुकसानभरपाईसाठी जबाबदार नसल्याचे म्हणणे फेटाळून लावले. लवादाने खान यांच्या उपचार खर्चाची देयके, वैद्यकीय अहवाल यांची दखल घेत या अपघातामुळे पूर्ण क्षमतेने खान यांची कामगार म्हणून काम करण्याची क्षमता कमी झाली आहे, असे नमूद केले. तसेच खान यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश ट्रकचा मालक आणि विमा कंपनीला दिले.