जगातील दुर्मिळात दुर्मिळ घटना असलेल्या एका तरुणाच्या मेंदूवर आलेली भली मोठी गाठ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढण्याचे काम नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने केले आहे. संबंधीत तरुणाच्या डोक्याएवढ्या आकाराची ही गाठ तब्बल १ किलो ८७३ ग्रॅम वजनाची आहे. ७ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याने डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नायर रुग्णालयातील न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ फेब्रुवारी रोजी ही ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रि‍या यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. संतलाल पाल नामक ३१ वर्षीय तरुणाच्या कवटीला जोडून त्याबाहेर ही गाठ आली होती.

संतलाल हा अनेक दिवसांपासून डोकेदुखीमुळे हैराण झाल्याने त्याला डॉक्टरांनी सिटी स्कॅन आणि एमआरआय करण्याचा सल्ला दिला होता. या तपासण्यांमध्ये संतलालच्या डोक्यात कवटीमधून डोक्याबाहेर मोठी गाठ पसरल्याचे निष्पण्ण झाले. या गाठीमुळे संतलालचे डोके दुप्पट आकाराचे दिसत होते. तसेच त्यामुळे त्याच्या डोक्यावर जडपणा आणि दृष्टीदोष निर्माण होऊन त्याला अंधत्व आले होते.

मात्र, नायर रुग्णालयातील डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी आणि त्यांच्या टीमने अत्यंत कुशलतेने हे प्रकरण हाताळत यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने रुग्ण संतलालला जीवदान मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर संतलालची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्यावर उपाचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.