मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा होत असतानाच पतंग पकडण्याच्या नादात भाईंदर रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रुळांवर गेलेल्या नऊ वर्षीय मुलाचा लोकलचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला तर पतंग काढण्यासाठी वीज खांबावर चढलेल्या मुलाचा जळगावमध्ये मृत्यू ओढवला. नालासोपाऱ्यातही पतंगासाठी वीज खांबावर चढलेला मुलगा होरपळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये गच्चीवरून पडून आकाश अर्जुन वाकोडे (वय १२) हा जखमी झाला. मुंबई शहर आणि उपनगरात मांजा लागून ४५ पक्षी जखमी झाले आहेत.

भाईंदर व मीरा रोड स्थानकांदरम्यान जुन्या फाटकाजवळ खेळत असताना गंगाराम रमेश बिंद पतंगाच्या मागे धावत रेल्वे रुळांवर पोचला. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा त्याला धक्का बसला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जळगावच्या नवीन जोशी कॉलनी भागात वीज तारांत अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का लागून मनोज रमेश जोशी (२२) याचा मृत्यू झाला.

विद्युत खांबाला अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या राजीव वाघरी (१३) या मुलाला विजेचा झटका लागून तो गंभीररीत्या होरपळला आहे. नालासोपारा पूर्वेच्या टाकीपाडा येथे शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

जुन्या नाशिकच्या नानावली परिसरात पतंग उडविण्यावरून शुक्रवारी सायंकाळी दोन गटांत झालेल्या वादाची परिणती तुफान दगडफेकीत झाली. यात एक वृद्ध महिला जखमी झाली.