पतंग काढण्यासाठी छतावर चढलेली दोन मुले उच्चदाबाच्या विजेच्या तारांचा धक्का बसल्याने भाजली आहेत. चेंबूर येथील यशवंत नगरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. यापूर्वीही विद्युतवाहिनीच्या धक्क्य़ामुळे चार मुलांचा मृत्यू घडल्याची घटना या परिसरात घडली होती.
नाना नानी पार्कसमोर यशवंत नगर या झोपडपट्टीत दुमजली, तीनमजली पत्र्याची घरे बांधण्यात आली आहेत. या घरांच्या छताच्या जवळून टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या वीज तारा जातात. याठिकाणी असलेल्या बाल विकास मित्र मंडळ या दुमजली बांधकामाच्या गच्चीवर संध्याकाळी पतंग काढण्यासाठी राजकुमार गुप्ता (११) व विक्रम गुप्ता (१५) चढले होते. साडेपाचच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि भाजलेल्या अवस्थेत राजकुमार खाली आला. त्याची अवस्था पाहून आसपासच्या मंडळींनी गच्चीवर धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विक्रम गुप्ता ९० टक्के भाजला असून त्याच्यावर राजावाडीत तर ६० टक्के भाजलेल्या राजकुमारवर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘उच्च दाबाच्या वीज तारा जात असलेला भाग कुंपण घालून बंदिस्त करणे आवश्यक आहे. मात्र या भागात झोपडय़ा उभ्या राहिल्या असून त्यांची उंची वाढत चालली आहे. तारांपासून अवघ्या  दीड ते दोन फुटांपर्यंत या झोपडय़ांचे छत आले आहे,’ असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नितीन नांदगावकर यांनी सांगितले.