दोन तरुणांना अटक; उर्वरित उत्तरपत्रिकांचा शोध सुरू

दहिसर पूर्वेकडील इस्त्रा महाविद्यालयातून चोरी झालेल्या दहावीच्या ३३० उत्तरपत्रिका शोधण्यात पोलिसांना यश आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या उत्तरपत्रिका सापडल्या असून, विद्यार्थ्यांनी त्यावर लिहिलेली उत्तरे जशास तशी आहेत. त्यामुळे या उत्तरपत्रिका तपासण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, सुमारे दीडशे उत्तरपत्रिकांचा शोध दहिसर पोलीस घेत आहेत. या उत्तरपत्रिका चोरणाऱ्या दोन तरुणांना दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. विक्रम शर्मा (१९) आणि आकिब शेख(१९) अशी दोघांची नावे आहेत. दोघांनी याआधीही संधी साधून शाळेतील साहित्य व अन्य कागदपत्रे चोरून रद्दीत विकल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

शाळेच्याच शेजारी राहणाऱ्या दोघांनी रद्दीत विकून काही पैसे हाती पडतील, त्यातून काही करता येईल या विचाराने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे चोरले. मात्र जेव्हा या उत्तरपत्रिका आहेत हे लक्षात आले तेव्हा त्यांनी हे गठ्ठे पुन्हा ठेवण्याचा तीनदा प्रयत्न केला. पण त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे घाबरून त्यांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परिसराला लागून असलेल्या नॅशनल पार्कच्या जंगलात (खदान नावाचा परिसर) फेकून दिले. या गुन्हय़ात विक्रम व आकिब यांना दोन अल्पवयीन मुलांनी मदत केल्याची माहिती समोर येते आहे. वरिष्ठ निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलांच्या सहभागाबाबत चौकशी व तपास सुरू आहे.

३ एप्रिलला ही चोरी घडली. शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाठक आपल्या कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा ठेवून चहा पिण्यासाठी बाहेर पडले. ही संधी साधून विक्रम, आकिब शाळेत शिरले. त्यांनी रद्दी म्हणून हाताला लागतील तितके न तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेतले आणि बिनबोभाटपणे शाळेच्या बाहेर पडले. सायंकाळी चारच्या सुमारास पाठक पुन्हा आपल्या कार्यालयात आले तेव्हा त्यांना इतिहास-राज्यशास्त्र, विज्ञान आणि संस्कृत विषयाच्या सुमारे ४८६ उत्तरपत्रिका गायब झाल्याचे समजले. सर्वत्र शोधाशोध करून, चौकशी करून उत्तरपत्रिका न मिळाल्याने त्यांनी तीन दिवसांनी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

पथकाने दोघांच्या हालचाली टिपल्या. त्यांचे वागणे संशयास्पद होते. अखेर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला.

रद्दीसाठी चोरी

उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात येताच त्या रद्दीत विकून चालणार नाही, चोरीची माहिती मिळताच पोलीस तपास करणार, आपण अटक होणार याची जाणीव झाल्याने दोघांनी गठ्ठे त्याच दिवशी रात्री जंगलात फेकून दिले. शोधमोहीम राबवून जंगलातून इतिहासाच्या १४९ तर संस्कृतच्या १८१ उत्तरपत्रिका शोधण्यात आल्या असून, उर्वरित उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे.