देशातील न्यायसंस्था मुकी-बहिरी असावी, असे प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी टीका करत सर्वोच्च न्यायालयातील कारभारातील दोष जगजाहीर करणाऱ्या त्या चार न्यायमूर्तीच्या धाडसाचे कौतुक वाटते, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर शनिवारी निशाणा साधला.

सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धती गेल्या दोन महिन्यांत बिघडल्याचा आरोप करत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तीनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाष्य केले. या चार न्यायमूर्तीवर आता कारवाई होईल अशी दाट शक्यता आहे. मात्र ती आकसाने होऊ नये. त्याचबरोबर केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

देशातील न्यायसंस्था मुकी-बहिरी असावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत. केवळ निवडणुका जिंकणे म्हणजे देशाचा कारभार चालवणे नव्हे. देशाबाबत असलेली जबाबदारी आपण पार पाडत आहोत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असा टोला ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला. चार न्यायमूर्तीना आपले प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते हे धक्कादायक आहे. आता न्यायसंस्थेवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

लोया मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी
न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका करण्यात आली आहे. चौकशीतून सत्य समोर येईल. कोणाचा काही दोष नसेल तसेही स्पष्ट होईल, असे उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

राष्ट्रपती मुंबईत कशासाठी?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी मुंबईत येत आहेत, त्यावरही ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पेचप्रसंग निर्माण झाला आहे, अशा वेळी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर का येत आहेत. मुंबईत असे काय महत्त्वाचे आहे की राष्ट्रपतींना दिल्ली सोडून मुंबईत यावे लागत आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.