उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंजूर केलेला निधी दुष्काळग्रस्तांच्या हाती पडतच नसल्याने हा पैसा नेमका कुणाकडे जातो अशी शंका व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणेवरच संशयाची सुई रोखली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार या प्रश्नाची तड लावतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून आल्यानंतर शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबतच्या सरकारी कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी मदतीचा निधी मिळत नाही, पण सावकारांना मात्र थेट कर्जनिधी मिळत आहे, असा आरोपही त्यांनी केला. औरंगाबादमधील संचेती नावाच्या सावकारास ८० लाखांचा कर्जनिधी मिळाला, असे सांगून, राज्यातील सावकारशाही अजूनही संपलेली नाही असा आरोपही ठाकरे यांनी केला.
दुष्काळग्रस्तांच्या अनेक तक्रारी आपल्याकडे येत असून या संदर्भात विधिमंडळात आवाज उठवावा अशा सूचना आपण शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने दुष्काळ प्रस्ताव उशिरा पाठविल्याने केंद्राकडून उशिरा मदत मिळत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्याचे निदर्शनास आणून दिले असता, उद्धव ठाकरे यांनी सिंह यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली उडविली. दुष्काळाने मंत्र्यांना पूर्वसूचना देऊन पडावे अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा खोचक सवालच ठाकरे यांनी केला. मंत्र्यांची अशी वक्तव्ये धक्कादायक तर आहेतच, पण दुर्दैवीही आहेत, असे ते म्हणाले.