17 July 2019

News Flash

पुलाखाली सुन्न गर्दी

हिमालय पुलाचा जो भाग दादाभाई नौरोजी मार्गावरून जातो तो भाग शुक्रवारीही बंद ठेवण्यात आला होता.

जगण्यातली अनिश्चितता आणि बेभरवशाची यंत्रणा या सुन्नतेमागे दाटलेली होती.

कालपर्यंत ज्या पुलावरून लगबगीने जाताना पायाखालचा स्लॅब किंवा दोन्ही बाजूंचे लोखंडी कठडे पाहण्याचीही उसंत मिळत नसे, त्याच पुलाच्या भकास लोखंडी सांगाडय़ाकडे पाहत हतबलता व्यक्त करणारे रेल्वे प्रवासी, पादचारी यांची सुन्न गर्दी शुक्रवारी सकाळी दिसत होती. दोन्ही बाजूंनी रस्ता बंद केल्याने वाहतूक नसलेल्या दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पूल केवळ अस्तित्व म्हणून उरला असला तरी त्या पुलाच्या अवस्थेकडे पाहून सर्वसामान्यांच्या अस्तित्वावर टिप्पणी करणाऱ्यांच्या मनातील खदखद उघड होत होती.

सीएसटी स्थानकात रोज लाखो मुंबईकर उपनगरांतून कामानिमित्त येत असतात. दादरच्या दिशेच्या डब्यातून प्रवास करणारे लोक येण्याजाण्यासाठी या हिमालय पुलाचाच वापर करत असतात. सकाळ-संध्याकाळ सतत गजबजलेला हा पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला आणि सहा जणांचा हकनाक बळी केला. या घटनेने सुन्न झालेले मुंबईकर शुक्रवारी सकाळी नित्यनेमाने कामावर गेले खरे; पण जवळपास प्रत्येक स्थानकावर, रेल्वे गाडीत, बसथांब्यांवर केवळ हिमालय पूल दुर्घटनेचीच चर्चा होती.

प्रत्यक्ष सीएसएमटीच्या परिसरात तर अनेक प्रवासी नेहमीच्या सवयीने पुलाकडे वळून मग माघारी फिरताना दिसत होते.

हिमालय पुलाचा जो भाग दादाभाई नौरोजी मार्गावरून जातो तो भाग शुक्रवारीही बंद ठेवण्यात आला होता. मात्र सीएसएमटी स्थानकात या पुलाचा वापर सुरू होता. मध्येच दुभाजक असल्यामुळे वळसा घालूनही अनेक जण हा पूल बघण्यासाठी उत्सुकतेपोटी येत होते. या पुलाचा तुटलेला सांगाडा हटवण्यासाठी या मार्गावर मोठमोठी यंत्रसामग्री आणण्यात आली होती. पालिकेचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी आले होते. कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांनी पुलाची पाहणी केली. प्रसारमाध्यमाची वाहने, लोकप्रतिनिधींची गर्दी आणि बघ्यांची गर्दी या रस्त्यावर होती.

या पुलाचा नियमित वापर करणारे लोक आज अक्षरश थांबून या पुलाच्या दिशेने बघत होते. आपण कसा रोज हा पूल वापरतो, याच्या कहाण्या लोक आपसात धास्तावलेल्या आवाजात सांगत होते. तर काही जण काल आपण कसे एका क्षणाच्या फरकाने वाचलो याच्या आठवणी सांगत होते.

First Published on March 16, 2019 12:48 am

Web Title: under bridge numb crowd