दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे वाढणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणामुळे मोठय़ा प्रमाणात पक्ष्यांचे स्थलांतर घडून येते. फटाक्यांच्या आवाजामुळे आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांची झाडांवरील घरटी जळतात. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या पक्ष्यांना दिवाळीत तात्पुरता का होईना आसरा मिळावा यासाठी विलेपार्लेतील एका पक्षीप्रेमी दाम्पत्याने अनोख्या ‘बर्ड फिडर’ कंदिलाची निर्मिती केली आहे. हा कंदील पक्ष्यांना दिवाळीत खाद्य आणि निवारा मिळवून देणारा आहे.

दिवाळीत फटाक्यांमुळे पक्ष्यांना कुत्री, मांजरी या प्राण्यांप्रमाणे खूप त्रास होतो. फटाक्यांच्या मोठय़ा आवाजामुळे कानाच्या नसा फाटून त्यांचा मृत्यू होतो. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो आणि अंधारात चाचपडताना भिंतीवर आदळून त्यांचा मृत्यू होतो. विलेपार्ले येथे राहणारे आशीष आणि रश्मी कदम हे दाम्पत्य दर दिवाळीला जखमी झालेल्या पक्ष्यांना रुग्णालयात घेऊन जातात. दिवाळी सणासुदीत त्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी कदम दाम्पत्याने सुतळीच्या साहाय्याने ‘बर्ड फिडर’ कंदिलांची निर्मिती केली आहे. पक्ष्यांनी या कंदिलावर येऊन राहावे यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. सुतळीच्या साहाय्याने हे कंदील तयार करण्यात आले आहेत. गोलाकार रचना असलेल्या या कंदिलाच्या खालच्या बाजूने पक्ष्यांच्या खाण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कंदिलांसाठी काम करीत आहोत. सुरुवातीला एक कंदील बनवून प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ही संकल्पना पुढे नेण्याचे ठरविले. सध्या आम्ही ५० कंदील बनविले आहेत. अनेकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. हे कंदील विकून आलेले पैसे बैलघोडा किंवा पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात येणार आहेत, असे आशीष यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर बर्ड फिडर कंदिलाविषयी प्रसिद्धी करण्यात आली होती.  हे पर्यावरणस्नेही कंदील अनेकांनी दिवाळीनंतरही दारासमोर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, असे आशीष कदम यांनी सांगितले.