पंधरा ते वीस फुटांची मूर्ती, डीजेंचा दणदणाट, डोळे दिपवून टाकणारी रोषणाई.. गणेशोत्सवातील या ‘ग्लॅमर’ची बाधा होऊ न देता मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये आजही काही मंडळे या उत्सवाचे पावित्र्य टिकवून आहेत. लहानशीच सुबक मूर्ती, प्रवचन-भजनांमध्ये गणरंगी रंगणाऱ्या या उत्सवांची किर्तीही काही कमी नाही. काहींनी पर्यावरणाचे भान राखतानाच आपले वेगळेपण जपण्यासाठी विविध वस्तूंपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

वडाळा येथील श्री कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली ४० वर्ष चाळीत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहे. जवळ-जवळ १७० घरे या चाळीत आहेत. १९७५ सालापासून येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र रस्त्यावरील कोणतीही जागा न अडवता, मंडळाच्या कार्यालयातच १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणपूरक उत्सवाची जाण ठेवून मंडळातीलच उत्साही कार्यकर्ते आजुबाजूचा देखावा साकारतात. डीजे, रोषणाईचा झगमगाट यांना फाटा देत शांत व मंगलपूर्ण वातावरणात येथे गणपतीचे आगमन होते. गणपतीची आरतीही पकवाज आणि टाळांच्या साहाय्याने केली जाते, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण दामणसकर यांनी सांगितले.

चाळीतील प्रत्येकाला दहा दिवस गणपतीच्या सेवेचे काम नेमून दिले जाते. चाळीतील महिला गणपतीत आवर्जून मंगळागौरीचे खेळ मांडतात. विसर्जनाच्या आदल्या दिवशी येथे महिला जागरण करुन रात्रभर मंगळागौर खेळतात. येथे प्रत्येकजण स्वयंसेवक आहे. त्यामुळे आजही ही चाळ एकत्र आहे. आमची चाळ पाडून इमारत बांधली तरी आम्ही याच उत्साहात उत्सव साजरा करु, असे मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र कोतवडेकर यांनी सांगितले.

Untitled-18

विलेपाल्र्यातील गणराज गणेश मंडळांने दरवर्षी प्रमाणे यंदाही कागदी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यासाठी बराच खर्च येतो. परंतु, पर्यावरणाची आपल्याकडून कोणतीही हानी होऊ नये, अशी आमची भावना आहे. त्यामुळे, डीजे किंवा अन्य ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाद्यांवर खर्च करण्याऐवजी तो निधी आम्ही इथे वापरतो, असे या मंडळाचे सदस्य जिग्नेश पटेल सांगतात.

Untitled-20

मालाडमधील रायपाडा मित्र मंडळाने यंदा कॉफीच्या कपचा वापर करुन गणेशाचे प्रतिक साकारले आहे. आजुबाजूची सजावटही कागदी वस्तूंपासून केली आहे. ही मूर्ती लहान आणि हलकी असल्याने विसर्जन आणि मिरावणुकीच्या वेळेस त्रास होत नाही, असे मंडळाचे अध्यक्ष संजय तुळसकर यांनी सांगितले.

Untitled-22

मालाडमधील साईदर्शन मित्र मंडळाने यंदा भारतीय मसाले ही संकल्पना समोर ठेवून गणपतीची आठ फूटी मूर्ती साकारली आहे. गजमुख राईपासून, गणपतीचे सोवळे वेलचीपासून तर हात आणि पोट दालचीनीपासून बनवले आहेत. दागिन्यांसाठी चक्रफूल, लवंग, जायफळ यांचा वापर केला आहे. ही मूर्ती अतिशय आकर्षक आणि चच्रेचा विषय बनली आहे, असे मंडळाचे व्यवस्थापक मोंटू रुईया यांनी सांगितले.