मराठा समाजाला नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर केले नाही तर एक डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी आज दिला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक मुंबईत झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला नोव्हेंबर महिन्यापर्यंत आरक्षण देण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे-पाटील, महेश राणे आदी उपस्थित होते.

एक डिसेंबरपासून होणारे आंदोलन हे कशा पद्धतीचे असेल हे अजून ठरले नसून पुढील बैठकीत ते ठरवण्यात येणार आहे. मात्र हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात मराठा समाजासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या हेल्पलाइनच्या माध्यमातून मराठा मोर्चासंबंधी, कर्ज व इतर योजनांची माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर आंदोलनावेळी ज्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत. ज्यांना अटक केली आहे. त्यांच्यामागे मराठा क्रांती मोर्चा उभारणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.