शैलजा तिवले

सुदृढ आरोग्यासाठी आहार पूरके म्हणून विविध जीवनसत्त्वांच्या गोळ्यांची आवश्यकता असली तरी चाचण्यांद्वारे शहानिशा केल्याशिवाय, डॉक्टरांचा सल्ला न घेताच या गोळ्यांचा वापर केला जात आहे. जाहिरातींचा सातत्याने होणारा मारा आणि आरोग्याबाबतची जागरूकता यामुळे सकस आहाराला पर्याय म्हणूनदेखील आहार पूरकांची मागणी केली जात असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

सर्वसाधारणपणे पन्नाशीनंतर आहारावर मर्यादा येतात. परिणामी विविध जीवनसत्त्वांचा होणारा अभाव भरून काढण्यासाठी ब, ड इत्यादी जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्याआधी शरीरातील याची कमतरता, उपलब्ध प्रमाण याच्या चाचण्या डॉक्टरांकडून केल्या जातात.

हल्ली याचा गैरवापर होत असून थोडासा थकवा जाणवल्यास किंवा कामाची दगदग होणार म्हणूनदेखील थेट औषधांच्या दुकानातून जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेणाऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.

आहार पूरकांचे दुष्परिणाम नसल्याचा प्रचार जाहिरातींमधून होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, कमतरता असल्याची शहानिशा न करताच यांचा वापर उत्तरोत्तर वाढत आहे. लहान बालकांसाठीही विविध प्रकारच्या चघळायच्या गोळ्या, सिरप बाजारात दाखल झालेले आहेत. पोळी भाजी खाण्यापेक्षा या गोळ्या खाणे सोपे असल्याचे सांगत काही जण याची मागणीही करतात. जाहिरातींमुळे सकस आहाराची जागा आता आहार पूरके बळकावत आहेत आणि याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी सांगतात.

‘विक्रीवर बंधने आवश्यक’

हाडे दुखायला लागली म्हणून कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘ड’ च्या गोळ्या थेट औषधांच्या दुकानातून घेण्याचे प्रमाण नोंद घेण्याइतपत वाढले आहे. अनावश्यक असूनही या गोळ्या घेतल्यास मूत्रपिंड, हृदयावर दुष्परिणाम होण्याचा संभव आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या देण्यावर बंधने आणणे अत्यावश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी यांनी स्पष्ट केले.

सकस आहार हाच पर्याय

* जीवनसत्त्वांच्या गोळ्या खाण्याकडे तरुण वर्गाचाही कल वाढत आहे. आजारी आहेत, ज्यांना सर्व आहार घेणे शक्य नाही किंवा ज्यांच्या आहारावर पथ्यामुळे बंधने आहेत. अशा व्यक्तींनाच शक्यतो जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची आवश्यकता भासते. त्याव्यतिरिक्त इतरांमध्ये कमतरता भासल्यास ती सकस आहाराने भरून काढणे शक्य आहे. भरपूर प्रमाणात, भाज्या, फळे खाणे हाच यावरील योग्य उपाय असल्याचे आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

* गेल्या काही वर्षांमध्ये बाजारात आहार पूरकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यात काही जीवनसत्त्वे आणि खनिजांचे मिश्रण अयोग्य आणि अतार्किक पद्धतीने केलेलेही आढळते. यांच्या किमतीवर बंधने नसल्याने ती महागही आहेत. सकस आहारावर भर देणे महत्त्वाचे असल्याचे इंडियन फार्मासिटय़ुकलच्या उपाध्यक्ष प्रा. मंजिरी घरत यांनी सांगितले.