‘वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कामाला वेग

मुंबई : अडीच वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेरीस वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डच्या जागेचा ताबा मिळाला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या प्रकाल्पाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही समुद्रावरील कामाला हात लावण्यात आलेला नाही.

वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कास्टिंग यार्डचे घोंगडे दोन वर्षांपासून भिजत पडले होते. सुरुवातीस ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने जुहू बीचवरच कास्टिंग यार्ड प्रस्तावित केले होते. मात्र त्याला आक्षेप घेणारी याचिका झोरू भथेना यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि जुहू बीचचा पर्याय सोडून द्यावा लागला. दरम्यान खासगी मालकीची जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी एकच प्रतिसाद आल्यामुळे दोन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावर महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत फेब्रुवारी २०२० मध्ये निर्णय घेण्यात आला.

मात्र सदर जागेचा ताबा महामंडळाकडे येणे बाकी होते. टाळेबंदीत हे काम रखडले होते. मात्र १५ दिवसांपूर्वीच कास्टिंग यार्डचा ताबा मिळाला असून, कंत्राटदारास त्याप्रमाणे सूचना दिल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

१०.४ हेक्टर

खासगी जागेचा ताबा पंधरा दिवसांपूर्वी घेतला असून करारानुसार भाडेतत्त्वावर महामंडळाकडे आला आहे. यापैकी पाच हेक्टर जागेचे भाडे महामंडळ भरणार असून, उर्वरित जागेचे भाडे कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रा भरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्याचा प्रस्तावित दर हा प्रति चौरस मीटर, प्रति महिना २४ रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सुपर स्ट्रक्चरचे काम सुरू  झाल्यानंतर कास्टिंग यार्डची गरज लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

समुद्रावरील काम अद्याप नाही

सी लिंकचे वांद्रे बाजूचे जमिनीवरील पाईलिंगचे काम डिसेंबरमध्ये सुरू झाले. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये समुद्रावरील कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र मार्चपर्यंत हे काम सुरू झाले नव्हते. त्यानंतर टाळेबंदीमुळे सर्वच कामे रखडली. त्यातच मजुरांच्या परत जाण्याचा परिणामदेखील झाला. मात्र पंधरा दिवसांपासून काम वेगाने सुरू झाले असून एका महत्त्वाच्या पाईल कॅपचे काम गेल्याच आठवडय़ात पूर्ण झाले. सध्या वांद्रे बाजूच्या एक किमीच्या जोड रस्त्याचे काम सुरूआहे.