वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला स्थगिती; पालिकेच्या उदासीनतेचाही परिणाम

स्थानिक रहिवाशांच्या पुढाकारातून गेले १०० हून अधिक आठवडे सुरू असलेल्या वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छतेला स्थानिक गुंडांमुळे आणि पालिकेच्या उदासीन दृष्टीकोनामुळे अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या कामापासून प्रेरणा घेत अनेक ठिकाणी स्थानिकांनी पुढाकार किनारा स्वच्छतेची मोहीम सुरू केली. मात्र वर्सोवा किनारा स्वच्छता मोहीमेतच खंड पडल्याने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेने जगातील सर्वात मोठे समुद्र किनारा स्वच्छता अभियान म्हणून या मोहीमेला गौरवले होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मधून या मोहिमेची वाखाणणी केली होती. मात्र या अभियानाचे प्रणेते अफरोज शहा यांनी रविवारी समाजमाध्यमाद्वारे ही स्वच्छता मोहीम थांबवत असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी स्वच्छता मोहिमेदरम्यान गुंडानी केलेली शिवीगाळ या मोहिमेत खंड पडण्याचे तात्कालिक कारण ठरले. परंतु, महापालिकेचा उदासीन दृष्टीकोन यामुळेही कार्यकर्त्यांचे कणाकणाने खच्चीकरण होत होते. कार्यकर्त्यांनी किनाऱ्यावरून जमा केलेला कचरा उचलून नेण्याची तसदीही स्थानिक पालिका प्रशासन घेत नव्हते. त्यामुळे कंटाळून हे अभियानच थांबवित असल्याचे शहा यांनी जाहीर केले आहे.

गेली १०९ आठवडे प्रत्येक शनिवार-रविवार वर्सोवा किनारा स्थानिक रहिवाशांच्या पुढाकाराने स्वच्छ केला जात होता. परंतु, आता हे काम थांबणार आहे. ‘किनाऱ्यावरुन आम्ही संकलित केलेला कचरा कधीच वेळेच उचलला जात नसे. या शिवाय स्थानिक गुंडांचा त्रास होता तो वेगळा. रविवारी तर काही गुंडांनी स्वयंसेवकांना चक्क शिवीगाळ केली. हे आता सहन होत नाही. त्यामुळे ही स्वच्छता मोहिमच स्थगित करण्यात येत आहे. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. मात्र ही मोहीम राबविण्यात अपयशी ठरलो,’ असे ट्विट अफरोज शहा याने केले आहे. व्यवसायाने वकील असलेले शहा २०१५ पासून ही स्वच्छता मोहीम राबवित होते. याबाबत अफरोज शहा यांचाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. रविवारी घडलेल्या शिवीगाळीच्या प्रकारामुळे शहा नाराज झाल्याचे स्थानिक नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी सांगितले. येत्या तीन दिवसात येथे साचलेल्या कचरा संकलित केला जाणार असल्याचा निर्णय स्थानिक आमदार आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

वाळुयुक्त कचरा उचलण्यात अडचण

कार्यकर्त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्याचे ढीग वर्सोवा किनाऱ्यावर साचून राहिले आहेत. हा कचरा वेळीच का उचलला जात नाही, असे पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कार्यकर्ते जेसीबीच्या सहाय्याने कचरा गोळा करतात. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाळू देखील येते. कंत्राटदार वाळुयुक्त कचरा उचलण्यास नकार देतो. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना कचरा विलगीकरणाचे काम करावे लागते. या कामास विलंब होतो. शिवाय कार्यकर्त्यांकडून ज्याठिकाणी कचरा गोळा केला जातो, तिथे कचरा गोळा करण्याऱ्या गाडय़ांना पोहचण्यास अडचण येते.

‘काम जोमाने करावे’

या कामापासून प्रेरणा घेत अनेक ठिकाणी स्थानिकांनी पुढाकार किनारा स्वच्छतेची मोहीम सुरू केली. मात्र मोहीमेत खंड पडल्याने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. ‘अशा पद्घतीच्या समाज आणि पर्यावरण हिताच्या मोहिमांना नेहमीच विरोध होत असतो. शिवाय काही टवाळखोरांच्या खवचटपणाचा सामना कार्यकर्त्यांना करावा लागतो,’ अशी प्रतिख्रिया ‘लेट्स ग्रीन फाऊंडेशन’चे सुभाजित मुखर्जी यांनी व्यक्त केली. तर स्थानिक प्रशासन नेहमीच पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाकडे पाठ फिरवत असतात. मात्र अफरोज यांनी निराश न होता स्वच्छता मोहिमेचे काम अधिक जोमाने करावे, अशी अपेक्षा ‘वनशक्ती’ या सामाजिक संस्थेचे संचालक डी. स्टॅलिन यांनी व्यक्त केली.

या स्वच्छता मोहिमेद्वारे किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही दिवसांपासून काही टवाळखोरांचा त्रास स्वयंसेवकांना होत होता. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत होतो. शिवाय आमच्याकडून कचरा उचलण्याचे काम चालू होते. परंतु आम्ही जमा केलेला कचरा उचललाच जात नसल्याचे माझ्या लक्षात आले. शेवटी सगळ्यांनी हतबल होऊन मोहीमच मागे घ्यायचे असे ठरले.

– अफरोज शहा

रिव्हर मार्च, आर संवर्धन मोहीम, वर्सोवा स्वच्छता मोहीम या स्थानिक रहिवाशांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आल्या होत्या. या मोहिमांना जर धक्का लागत असेल, तर यापुढे मुंबईकर स्वयंप्रेरणेने पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी पुढे येणार नाहीत. त्यामुळे अशा मोहिमांना होणारा त्रास खेदजनक आहे.

– गोपाळ झवेरी, रिव्हर मार्च

* ऑक्टोबर २०१५ – वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात.

* जून २०१६ – मोहिमेला पालिकेचे सहकार्य

* जुलै २०१६ – संयुक्त राष्ट्र परिषदेतर्फे मोहिमेला जगातील सर्वात मोठी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेने गौरवले.

* डिसेंबर २०१६ – अफरोज शहा यांना संयुक्त राष्ट्र परिषदतर्फे सन्मानित करण्यात आले.

* फेब्रुवारी २०१७ – मोहिमेची प्रेरणा घेऊन इंडोनेशियामध्ये किनारा स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली.

* मार्च २०१७ – पालिकेतर्फे शहा यांनी तयार केलेला स्वच्छता मोहीम आराखडा स्वीकारण्यात आला.