रुपारेल महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दरवर्षी VIBGYOR ह्या दोन दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले जाते. VIBGYOR चे हे सातवे वर्ष आहे. ह्या वर्षी 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. माणसाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं ह्या घटनेला ह्यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून ह्यावर्षी VIBGYOR हा महोत्सव खगोलशास्त्र ह्या संकल्पनेवर आधारित असेल.

भारताची खगोलशास्त्राची प्राचीन परंपरा, वेगवेगळ्या देशांमध्ये या क्षेत्रात झालेलं आधुनिक काळातलं संशोधन, भारताचं या क्षेत्रातलं योगदान आणि प्रगती अशा विविध अंगांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला असून शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महोत्सवातून प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या महोत्सवात नेहरू सायन्स सेंटरचे संचालक डॉ. अरविंद परांजपे, आयआयटी मुंबईचे डॉ. अभय देशपांडे, विल्सन कॉलेजचे प्रा. महेश शेट्टी आदी नामवंत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय खगोलशास्त्रातील विविध कल्पनांवर विविध प्रतिकृती तयार करण्यात आली असून यामध्ये जंतरमंतर वेधशाळा, केपलर्स लॉज मॉडेल, पार्कर प्रोब मॉडेल, मार्स रोव्हर आदींचा समावेश आहे. तसेच पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा व पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासंदर्भातही माहिती सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाची संकल्पना व निर्मिती हे संपूर्णपणे रूपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले असून हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि जिज्ञासूंनी VIBGYOR चा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.