विदर्भ साहित्य संघाची साहित्य महामंडळावर टीका; कारभार सुधारण्यासाठी ३० कलमी योजना सादर
राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित संस्था, धनदांडगे यांच्या हातात गेलेले आणि खर्चीक असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरविलेच पाहिजे, असे कोणतेही घटनात्मक बंधन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर नसल्याची बाब समोर आली आहे.
साहित्य संमेलन राजकारणी आणि धनिकांच्याच उपयोगाचे झाले असून, संमेलन महामंडळाच्या नियंत्रणात राहिले नसल्याची टीका महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. डॉ. जोशी यांनी या संदर्भात महामंडळाला पुन्हा मूळ कामाकडे वळविण्यासाठी काय केले पाहिजे, याची सविस्तर ३० कलमी कृती योजनाही सादर केली आहे. योजनेचे टिपण त्यांनी साहित्य क्षेत्राशी संबंधित २२५ मान्यवरांना पाठविले होते. त्यापैकी काही जणांकडून आलेल्या सूचना त्यांनी महामंडळाला सादर केल्या आहेत.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या धोरणात एकसूत्रीपणा व सहकार्य निर्माण करणे आणि मराठी भाषेचे अस्तित्व व संवर्धन हे मंडळाचे व्यापक उद्दिष्ट असले तरी यापासून मंडळ पूर्ण भरकटले आहे. प्रत्यक्षात दरवर्षी एक साहित्य संमेलन, महामंडळाचा वर्धापन दिन व एका वार्षिक अंकाचे प्रकाशन एवढय़ा तीन कामांपुरतेच ते मर्यादित राहिले असल्याचा टोला डॉ. जोशी यांनी लगावला. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती याबाबत मार्गदर्शक व दिशादर्शक ठरतील अशी व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा शासनाचे संबंधित विभाग यांच्या सहकार्याने सातत्याने आयोजित केल्या जाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कृती योजनेतील सूचना
* कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद या व अन्य महत्त्वाच्या संस्थांना महामंडळात सामावून घ्यावे
* महामंडळाचे अधिवेशन दरवर्षी व तीन वर्षांनी एकदा साहित्य संमेलन घ्यावे
* संमेलनाध्यक्षपद विभागवार फिरते ठेवावे
* घटक संस्थांनी प्रत्येकी तीन नावे सुचवून त्यातून एकाची निवड करावी
* संमेलनात केलेल्या ठरावांचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेकडे जाणार आहे. लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे महामंडळाच्या नव्या कार्यकारिणीने याबाबत निर्णय घ्यावा.
-डॉ. माधवी वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मावळत्या अध्यक्षा