डॉ. विजया मेहता यांच्या भावना  

‘कला या संशोधनाची मालिकाच असतात. कलाकृती उभी राहताना प्रत्येक टप्प्यावर संशोधन करावे लागते. त्यासाठी ‘दी एशियाटिक सोसायटी’चे मोठे योगदान आहे. नव्या पिढीमध्येही ही संशोधनाची बीजे या माध्यमातून रुजतील,’ अशा भावना ज्येष्ठ दिग्दर्शिका डॉ. विजया मेहता यांनी सोमवारी व्यक्त केल्या.

एशियाटिक सोसायटीच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने डॉ. मेहता यांच्यासह डॉ. फैजल देवजी,  डॉ. ज्योतिंद्र जैन, गुलझार, डॉ. जिम मेसलॉस, न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा,  डॉ. उषा ठक्कर, डॉ. फारूख उदवाडिया यांचाही सन्मान करण्यात आला. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’चा २१५ वा वर्धापनदिन सोमवारी साजरा करण्यात आला. इतिहास आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. फैजल देवजी, इतिहास, संस्कृती आणि कला क्षेत्राचे अभ्यासक डॉ. ज्योतिंद्र जैन, ज्येष्ठ कवी, दिग्दर्शक गुलजार, इतिहासाचे अभ्यासक डॉ. जिम मेसलॉस, ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शिका डॉ. विजया मेहता, माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा, मणीभवनच्या सचिव, अर्थशास्त्राच्या अभ्यासक डॉ. उषा ठक्कर, ब्रिचकँडी रूग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. फारूख उदवाडिया यांचा यंदा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे एशियाटिक सोसायटीच्या संस्थापकांची ओळख करून देणाऱ्या पुस्तक मालिकेतील माधवी कामत, कुंजलता शाह, वृंदा पाठारे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. इटलीच्या राजदूत स्टेफनिया कोस्टन्झा यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.

सन्मानानंतर भावना व्यक्त करताना डॉ. मेहता म्हणाल्या, ‘एशियाटिक सोसायटीचे योगदान खूप मोठे आहे. अनेक देशी-परदेशी अभ्यासकांना आणि संशोधकांना या संस्थेने आधार दिला आहे.’