वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर केवळ आपल्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी सुरेखाने एका लहानशा खेडय़ातून मुंबईसारख्या महानगरीत पुरुषांची मक्तेदारी असलेला बूट-पॉलिश व्यवसाय हाती घेतला. याचदरम्यान आवड असूनही अर्धवट राहिलेले शिक्षण आणि तिच्या जगण्यातला रोजचा संघर्ष यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘लोकसत्ता’च्या ‘मुंबई वृत्तांत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
याची दखल घेत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारतर्फे तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’चे सहृदय वाचकही सुरेखाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
‘आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी तिचे ‘बूट-पॉलिश’ हे वृत्त ‘मुंबई वृत्तांत’ने २ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सुरेखाच्या शिक्षणाबाबतची माहिती काढण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी बोरिवलीच्या प्रेमनगर परिसरातील सुरेखाचे दुकान शोधून काढले. तिची शाळा कोणती, ती तिने कधी सोडली, शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत झाले, विषयाची आवड, दुकान चालवताना कोणी त्रास देत नाही ना, अशा प्रश्नांसह सुरेखाचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले.
त्याचप्रमाणे तिला तिचा व्यवसाय सांभाळून शिक्षणही घेता यावे यासाठी जवळच्या शाळेत दाखल करून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणमंत्र्यांनी आपल्या दूरध्वनीहून सुरेखाशी संपर्क साधून तिची विचारपूसही केली. ‘पुढच्या शिक्षणाची अजिबात काळजी करू नकोस. तुला संपूर्ण मदत मिळेल,’ असा विश्वास तावडे यांनी दिल्याचे सुरेखाने सांगितले.
‘लोकसत्ता’च्या वाचकांनीही सुरेखाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. सुरेखावरील सहा हजार रुपयांचे कर्ज फेडले जावे यासाठी संगणक अभियंता असलेल्या नवी मुंबईच्या सुरेखा मते यांनी ‘लोकसत्ता’कडे सहा हजार रुपयांचा धनादेश पाठवला आहे. त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे उपाध्यक्ष नयन कदम यांनीही रोख सहा हजार रुपये सुरेखाला मदत म्हणून दिले. याशिवाय काही तरुणांनी नाव न सांगता अडीच हजार रुपयांची मदत केली आहे.