यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग अर्थात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवासी वाहनाच्या वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदनगर येथील एका वाहनचालकावर १२०० रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्दची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वेग मर्यादा ओलांडल्यास कारवाईची केवळ घोषणाच नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीही पोलिसांकडून सुरु झाली आहे.

अहमदनगर येथील आशिर शेख या प्रवासी वाहन चालकावर महामार्ग पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. २८ जानेवारी २०१९ रोजी शेख यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाताना सकाळी १०.१५ मिनिटांनी वेग मर्यादेचे उल्लंघन करीत ८४ किमी प्रती तास इतक्या वेगाने प्रवासी वाहन चालवले होते. त्यांच्या वाहनाचा हा वेग द्रुतगती महामार्गावर बसवण्यात आलेल्या नियंत्रण यंत्रणेतील कॅमेरॅत कैद झाला आहे. यावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार शेख यांनी स्वतःसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होईल इतक्या वेगात वाहन चालवले होते.

या कारवाईबाबतचा सविस्तर अहवाल पनवेलच्या कळंबोली प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या कारवाईची रितसर पावतीही चालक शेख यांना देण्यात आली असून त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेण्यात आली आहे.