औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादावादीने भीषण रुप धारण केल्याने हिंसाचार भडकला असे औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाला होता असे त्यांनी सांगितले. महापौरांनी नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हिंसाचारग्रस्त भागात फिरुन नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत अशी माहिती घोडेले यांनी दिली. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मोतीकारंजा भागात जोरदार हिंसाचार झाला. हिंसक झालेल्या जमावाने दुकाने तसेच वाहनांची मोठया प्रमाणावर जाळपोळ केली.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात वाद झाला.

तलवार, चाकू, लाठयाकाठयांसह सज्ज होऊन आलेल्या जमावाने तुफान दगडफेक केली. अनेक पोलिसही या दगडफेकी जखमी झाले आहेत. २५ ते ३० जण या हिंसाचारात जखमी झाले असून २५ दुकाने पेटवून देण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मोतीकारंजा भागातील रस्त्यावर जळालेली वाहने दिसत असून अनेक ठिकाणी दगडांचा खच पडला आहे.

गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव असून या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.