औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान आता औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून संवेदनशील भागांमध्य मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमकही औरंगाबादमध्ये पोहोचली आहे. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाने भीषण रुप धारण केल्याने हिंसाचार भडकला असे औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

औरंगाबादचे खासदार आणि आमदारांनी स्वत: तणावग्रस्त भागात जाऊन नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मोतीकारंजा भागात जोरदार हिंसाचार झाला. हिंसक झालेल्या जमावाने दुकाने तसेच वाहनांची मोठया प्रमाणावर जाळपोळ केली.

तलवार, चाकू, लाठयाकाठयांसह सज्ज होऊन आलेल्या जमावाने तुफान दगडफेक केली. अनेक पोलिसही या दगडफेकी जखमी झाले आहेत. २५ ते ३० जण या हिंसाचारात जखमी झाले असून २५ दुकाने पेटवून देण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मोतीकारंजा भागातील रस्त्यावर जळालेली वाहने दिसत असून अनेक ठिकाणी दगडांचा खच पडल्याचे दिसत होते.