शैलजा तिवले

राज्यात रोजची रुग्णवाढ घसरणीला; मात्र बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवरच

राज्यातील रोजच्या रुग्णवाढीचा आलेख उतरणीला लागल्याचे चित्र दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात रोजची रुग्णसंख्या सरासरी २७ टक्क्यांनी घटली आहे. मात्र, रोजच्या चाचण्यांमध्येही घट झाली असून, बाधितांचे प्रमाण मात्र आधीइतकेच म्हणजे २० टक्केआहे. त्यामुळे नव्या रुग्णसंख्येतील घट आभासी आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात रोज १३ ते १४ हजार रुग्ण आढळत होते. सप्टेंबरअखेरीस ही संख्या रोज १८ हजारांच्या आसपास नोंदविण्यात येत होती. राज्यात ११ सप्टेंबरला सर्वाधिक २४,८८६ इतके नवे रुग्ण नोंदविण्यात आले होते.

गेल्या दहा दिवसांपासून मात्र राज्यात रोजच्या रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात येत असल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात दरदिवशी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १० ते १२ हजारांपर्यंत घसरली आहे. सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या पहिल्या सहा दिवसांतील रुग्णांच्या सरासरीची तुलना केल्यास रुग्णसंख्या वाढीत सुमारे २७ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत दरदिवशी आढळलेल्या नव्या रुग्णांची सरासरी १९,०६० नोंदली गेली. ऑक्टोबरमध्ये याच कालावधीत नव्या रुग्णांची सरासरी १३,७६९ आहे.

सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण २७ टक्क्यांनी घटले आहे. मात्र, राज्यातील करोना चाचण्यांमध्येही घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात दररोज सुमारे ८७ हजार करोना चाचण्या केल्या जात होत्या. सप्टेंबरमध्ये रोजच्या चाचण्यांची संख्या सुमारे ९९ हजारांवर पोहोचली होती. ऑक्टोबरमध्ये चाचण्यांच्या संख्येत घट होऊन त्या ७० ते ८० हजारांवर आल्या.

ऑगस्टमध्ये दरदिवशी चाचण्या केलेल्यांपैकी १८ टक्के करोनाबाधित असल्याचे आढळत होते. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण २० टक्के नोंदले गेले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ातही हे प्रमाण २० टक्केच राहिले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत असले तरी बाधितांच्या प्रमाणात घट झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘मृत्युदर, बाधितांचे प्रमाण कमी होणे आवश्यक’

रुग्णसंख्येत घट होण्यापेक्षाही राज्याचा मृत्युदर एका टक्क्याहून खाली आणणे गरजेचे आहे. सध्याचा मृत्युदर २.६४ टक्के आहे. तसेच संसर्ग नियंत्रणात आणायचा असल्यास चाचण्या केलेल्यांपैकी बाधितांचे सध्याचे प्रमाण २० टक्क्यांवरून ५ टक्क्यांच्या खाली आले पाहिजे, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

देशाची रुग्णसंख्या ६७ लाखांवर

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ७२,०४९ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६७,५७,१३१ झाली आहे. त्यातील ५७,४४,६९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ८५.०२ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली. दिवसभरात ९८६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १,०४,५५५ झाली आहे. मृतांचे हे प्रमाण १.५५ टक्के आहे. देशभरात ९,०७,८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत उच्चांकी रुग्णवाढ

मुंबईत बुधवारी २,८४८ रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील एका दिवसातील आतापर्यंतची ही उच्चांकी वाढ आहे. मुंबईत दिवसभरात २,२५७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. गेल्या २४ तासांत ४६ करोनाबळींची नोंद झाली.

सिटी स्कॅन, क्ष-किरण चाचण्यांद्वारे पळवाट

सरकारी यंत्रणा दाराशी नको म्हणून आरटी-पीसीआर चाचणीऐवजी सिटी स्कॅन, क्ष-किरण यांसारख्या चाचण्यांमधून करोना निदान करण्याकडे रुग्णांचा कल वाढत आहे. संबंधित डॉक्टरांकडून हे रुग्ण उपचारही घेतात. हे रुग्ण सरकारी आकडेवारीत दिसत नाहीत. चाचण्यांची संख्या रोज दीड लाखांपर्यंत नेणे आवश्यक असून, त्यातील आरटी-पीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक असल्याचे करोना कृतिदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केले.

रुग्णवाढीचा उतरता आलेख

२७ सप्टेंबर -१८,०५६

२८ सप्टेंबर – ११,९२१

२९ सप्टेंबर – १४,४७६

३० सप्टेंबर -१८,३१७

१ ऑक्टोबर – १६,४७६

२ ऑक्टोबर – १५,५९१

३ ऑक्टोबर – १४,३४८

४ ऑक्टोबर- १३,७०२

५ ऑक्टोबर -१०,२४४

६ ऑक्टोबर-१२,२५८