|| सचिन धानजी

दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सुरू असलेल्या तिरंदाजी प्रशिक्षणावेळी संरक्षण पत्रे छेदून एक बाण थेट महापौर निवासस्थानी पडला. मात्र या घटनेनंतर त्वरित महापालिका अधिकाऱ्यांनी या अकादमीवर कारवाई करत तेथील संरक्षण पत्रेच काढून प्रशिक्षण बंद पाडले. शनिवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे धनुष्यबाण आहे. महापौरांनी या बाणाला घाबरून या नामांकित धनुर्विद्या प्रशिक्षण संस्थेवर कारवाई केल्याची चर्चा सुरू झाली.

शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाशेजारील वीर सावरकर स्मारकात गेल्या ९ ते १० वर्षांपासून धनुर्विद्या प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अकादमीने सुरक्षेसाठी आजूबाजूला संरक्षक पत्रे लावले आहेत.  परंतु सुरक्षेसाठी लावलेले हे पत्रे छेदून शुक्रवारी एक बाण महापौर निवासाच्या हिरवळीवर येऊन पडला होता. त्यांनतर सूत्रे हलली आणि शनिवारी सकाळी महापालिका ‘जी- उत्तर’ विभागच्या अधिकाऱ्यांनी त्या अकादमीवर कारवाई करत थेट तेथील पत्रेच काढून टाकले.

या अकादमीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ९ खेळाडू घडवले आहेत. महापौर निवासाच्या हिरवळीवर बाण पडलेला आढळल्याने आणि यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे ‘जी-उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी स्पष्ट केले आहे. कारवाई करण्याआधी आम्ही महिन्याभरापूर्वी त्या संस्थेला नोटीस दिलेली होती. या बाणामुळे कुणाच्या जिवास धोका निर्माण होऊ  शकतो.

या कारवाईप्रकरणी कुणाचीही तक्रार नव्हती. महापौर निवासाच्या देखभालीकरिता असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांकडून आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खेळाला फटका

प्रशिक्षणवर्गाला सुरुवात होऊन आता ९ वर्षे झाली आहेत. पण महापालिकेने ही कारवाई करण्यापूर्वी कोणतीही कल्पना दिली नाही. मुळातच या धनुर्विद्य प्रशिक्षणातील बाणांनी जिवास कुठलाही धोका नाही. या ठिकाणी ८ फुटांची भिंत आहे. पण मागे एकदा असा प्रकार घडला होता तेव्हा आम्ही सुरक्षेसाठी १२ फूट उंचीचे पत्रे लावले होते. आम्ही सुरक्षेकडे पूर्ण लक्ष दिलेले आहे. तरीही या प्रकरणी चर्चा करून सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना करता आली असती, असे स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले. या कारवाईमुळे येथील खेळ धोक्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हाला किमान अन्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी  मागणी त्यांनी केली आहे.

महापालिका प्रशासन किंवा पोलीस यांना मी कारवाई करण्याबाबत काहीही सांगितलेले नाही. याआधी दोन वेळा बाण पत्रा छेदून महापौर निवासाच्या हिरवळीवर आले होते. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका महापौर निवासावर होत असतात. त्यामुळे सुरक्षा हाच एक मुद्दा आहे. समुद्र किनाऱ्यावरही लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यांच्याही सुरक्षेचा मुद्दा आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेत महापालिकेने ही कारवाई केली असावी.   – विश्वनाथ महाडेश्वर, महापौर