मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिलन सबवे येथे बांधलेल्या उड्डाणपूलावरून विमानतळावरुन होणाऱ्या विमानांचे उड्डाण पाहण्यासाठी व छायाचित्र काढण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. अखेर तेथे ‘येथून विमानतळाचे छायाचित्रण करू नये’ असे फलक लावण्याची वेळ प्राधिकरणावर आली. पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन अनेकांचे विमानतळ पर्यटन सुरू आहे. महिनाभरात या ठिकाणी दृश्यप्रतिबंधक यंत्रणा (व्ह्यू कटर) लावले जातील, असे ‘एमएमआरडीए’कडून सांगण्यात येत आहे.
मिलन सबवे येथे सुमारे ७०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला. मे महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होऊन हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला. या पुलावरून विमानतळावरील धावपट्टी दिसते. धावपट्टीवरुन उडणारी आणि उतरणारी विमाने पाहण्यासाठी लोक पुलावर गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ‘छायाचित्र काढू नये, छायाचित्रण करु नये’ अशा सूचना देणारे फलक लागले. पण तरीही पर्यटकांची वर्दळ कायम आहे. या पुलाच्या सुमारे २०० मीटरच्या भागातून विमानतळ दिसणार नाही अशारितीने दृश्य प्रतिबंधकयंत्रणा (व्ह्यू कटर) लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महिनाभरात ते काम पूर्ण होईल, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.