करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कु ठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

करोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत. मात्र के ंद्रानेही लशींचा जादा पुरवठा करावा, तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केली.

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरणावरून के ंद्र आणि राज्यात सुरू झालेल्या संघर्षाच्या पाश्र्वाभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवाद माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडताना राज्यात भाजप करीत असलेल्या राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आणि स्थानिक नेत्यांना समज देण्याची विनंती केली.

राज्यात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यांत ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के प्रतिजन चाचण्या होतात. हे समाधानकरक असले तरी चाचण्या अजून वाढवाव्यात असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी यावेळी सांगितले.

आम्ही गेल्या वर्षापासून करोनाची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात प्रादुर्भाव थोपविण्यात यशही आले होते. राज्यात अडीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्रानेही काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसमारंभ यांच्या आयोजनाने साथीची तीव्रता वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागांतून विषाणूचा उद्रेक सुरू झाला आणि कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या ‘म्युटेशन’मुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. तसेच आरटीपीसीआर चाचण्या ७० टक्यांपेक्षा जास्त करण्यात येतील आणि लसीकरण आणखी वाढवण्यात येईल, मात्र त्यासाठी केंद्राचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसमात्रांचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० मात्रा मिळाल्या आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. पण सध्या लशींची टंचाई असून काही केंद्रे बंद पडली आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले.

१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख मात्रा देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामुळे मागणीनुसार लस पुरवठा करावा, अशी विनंती ठाकरे यांनी यावेळी के ली. तसेच राज्याला ऑक्सिजनची मोठी गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची बाधितांची संख्या पाहता १७००-२५०० मेट्रिक टन इतक्या आक्सिजनची एप्रिल अखेरपर्यंतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

औषध उत्पादकांकडून राज्याला रेमडिसीवीर औषधाचा पुरवठा करण्यात यावा. या औषधाच्या किंमतीवर महाऔषध नियंत्रकांचे नियंत्रण असावे. राज्यात सध्या रेमडिसीवीरच्या साधारणत: ५० ते ६० हजार बाटल्यांचा वापर सुरू आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता एप्रिल अखेरपर्यंत ही  गरज प्रतिदिन ९० हजार ते १ लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते. त्यामुळे रेमडिसीवीरची निर्यातही थांबवावी अशी विनंती मुख्यमंत्र्यानी के ली.  राज्याची गरज लक्षात घेऊन केंद्राने आणखी १२०० कृत्रिम श्वसन यंत्रे द्यावीत. बंद यंत्रे सुरू करण्यासाठी तंत्रज्ञ द्या, अशीही मागणी करण्यात आली.

हाफकिनला परळ येथे कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवला आहे. तो मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी २२८ दशलक्ष मात्रा तयार करण्यात येतील आणि लसीकरणाला वेग येईल.

उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री