गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंतच्या जलबोगद्याच्या खोदकामाला शनिवारी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. घाटकोपर पूर्व येथील हेगडेवार मैदानात खोदकामाचा शुभारंभ झाल्यानंतर बोगदा खोदाई यंत्राने आर.सी. एफच्या दिशेने  खोदकामास सुरुवात केली. या जलबोगद्यामुळे चेंबूर, देवनार, मानखुर्द विभागाच्या पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा होणे अपेक्षित असून या विभागांचा सन २०६१ पर्यंतच्या पाण्याच्या वाढीव मागणीचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

मुंबईची भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी पालिके तर्फे  जलबोगदे तयार केले जात आहेत. त्याअंतर्गत घाटकोपर पूर्व येथील हेगडेवार मैदान (अमर महल) ते प्रतिक्षा नगर, वडाळा आणि तेथून पुढे परळच्या सदाकांत ढवळ उद्यानापर्यंत ९.६ किलोमीटरचा जलबोगदा, त्याचप्रमाणे हेगडेवार मैदान ते आरसीएफ आणि आरसीएफ ते बीएआरसी दरम्यान साडे पाच किलोमीटरचा जलबोगदा बांधण्यात येईल. या दोन्ही बोगद्यांचे काम एकाचवेळी सुरू आहे.

जलबोगद्याच्या बांधकामाचा कालावधी ७२ महिन्यांचा असून २०२४ पर्यन्त हा बोगदा कार्यान्वित होईल.

कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमर महल ते प्रतिक्षा नगर  आणि पुढे परेल पर्यंतच्या जलबोगद्याच्या बांधकामाच्या  प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पांतर्गत  हेडगेवार उद्यान , प्रतीक्षा नगर आणि परळ  येथे सुमारे १०१ ते १०९ मी. खोलीचे तीन कुपके बांधण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या दोन कुपकांचे खोदकाम पूर्ण झाले असून परळ येथील कुपकाचे खोदकाम प्रगतिपथावर आहे. या दुसऱ्या जलबोगद्यामुळे परळ, शिवडी, वडाळा तसेच कुर्ला व भायखळा येथील पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे.

जलबोगद्यांचे शतक

पाणी पुरवठय़ामध्ये सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प  खात्याने आतापर्यंत सुमारे ८६ कि. मी. लांबीचे जलबोगदे बांधले असून वरील दोनही जलबोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर जलबोगद्यांच्या लांबीचे शतक पूर्ण होणार असल्याचे यावेळी वेलरासू यांनी सांगितले.