लढायचे आहे ते स्वबळावरच एकहाती सत्ता आणायची ती महाराष्ट्रातच, अशी गर्जना आज युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली. पुन्हा एकदा स्वबळ आजमवण्याचा नारा त्यांनी पुन्हा एकदा दिला. तन आणि मन लावून शिवसैनिक लढत असतात. आपल्याला फक्त मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायचीच ही शपथ मी या मंचावरून घेतो आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी कायम तुम्हा सगळ्यांसोबत आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायचीच असा नारा आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त गोरेगावात सुरु असलेल्या सभेत ते बोलत होते.

डहाणूला जी पोटनिवडणूक झाली तेव्हा सगळ्यांना असे वाटले होते की आपण ऐनवेळी अर्ज मागे घेणार. मात्र तसे घडले नाही आपण त्वेषाने लढलो. साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरणाऱ्यांचा विजय झाला हे खरे असले तरीही जनमत आपल्या बाजूने होते हे विसरू नका. असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  शिवसेनेची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला ठाऊक आहेच. सत्तेत राहून शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम शिवसेनेने जेवढ्या प्रमाणात केले ते कोणताही पक्ष करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत घुमला त्याचमुळे आपल्यामागे मोठा आशीर्वाद लाभला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. जनसेवेसाठी सर्वात पुढे असतो तो फक्त आणि फक्त शिवसैनिक इतर पक्षाचे नेते फक्त पक्षात किती कार्यकर्ते आहे ते सांगतात. मात्र संकट आले की जात-पात-धर्म न पाहता रक्तदानासाठी पुढे उभा असतो तो शिवसैनिक असतो असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्याने माझे पाय धरले त्यावेळी मी त्यांना म्हटले माझे पाय धरू नका मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तेव्हा तो शेतकरी म्हटला की तुमच्या वडिलांमुळे म्हणजेच उद्धव ठाकरेंमुळे मी आत्महत्या केली नाही. त्यांनी दिलासा दिला म्हणून मी आज जिवंत आहे. शिवसेनेचे जे बळ आहे ते हेच आहे इतर कोणत्याही पक्षाला लोकांचे प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही कमावता येणार नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे धोरण शिवसेनेने आजही जपले आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.