मालाड, कांदिवलीच्या काही भागांतील पाणीपुरवठा खंडित

कांदिवली पूर्वेकडील दामूनगर येथील जलवाहिनी बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फुटल्यामुळे कांदिवली, मालाड पूर्वेकडील काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. ही जलवाहिनी एके ठिकाणी चेपली गेली आहे. वाहिनी फुटल्याने काही ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण होऊन ती चेपली गेली असावी, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मालाड पूर्वेकडील परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दामूनगरमधून जाते. गळती झाल्यामुळे मोठ्ठा आवाज करत ती फुटली. या आवाजामुळे त्या परिसरातील नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. जलवाहिनी फुटल्यावर स्थानिकांनी तात्काळ कांदिवलीच्या आर दक्षिण महापालिका विभागाला माहिती दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून जलअभियंता विभागाला कळवले. गुरुवारी सकाळपासूनच विभागाचे अधिकारी वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत होते. ज्या भागात जलवाहिनी फुटली, त्या ठिकाणी पाणी नव्हते. त्यामुळे मोठी हानी टळली, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, दुरुस्तीमुळे मालाडच्या पी उत्तर विभागातील गोकुळ नगर, भीमनगर आप्पापाडा, हनुमान नगर, वडारपाडा, आकुर्ली रोड, नरसीपाडा या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.

गुरुवारी सकाळपासूनच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम पूर्ण करण्यात आले. जलवाहिनी ज्या ठिकाणी फुटली होती, तेथे पाणी नव्हते. मात्र दुरुस्तीमुळे मालाड, कांदिवलीतील काही भागांत पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. जलवाहिनी दुरुस्ती झाल्यावर तेथील नागरिकांना काही वेळ पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल.

एस. ए. तवाडिया, मुख्य अभियंता, जलअभियंता विभाग