मुंबई

उस्ताद अल्लादिया खाँ यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात प्रस्थापित केलेल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेतील ज्येष्ठ गायिका म्हणून गानयोगिनी दिवंगत धोंडुताई कुलकर्णी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या संगीत परंपरेत कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये अशा निष्ठेने शुद्ध परंपरा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. अशा या ज्येष्ठ गानयोगिनीला आदरांजली वाहण्यासाठी शाश्वतसूर, बाल विकास संघ आणि दिवंगत पं. धोंडुताई कुलकर्णी शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचा ‘गानयोगिनी संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी होणाऱ्या महोत्सवात दीपिका भिडे (गायन), सत्यजित तळवलकर (तबलावादन), पं. शुभदा पराडकर (गायन), जशन भूमकर (गायन), ऋतुजा लाड (गायन), पं. राम देशपांडे (गायन) तसेच आदित्य खांडवे, शाल्मली जोशी (गायन) हे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना यती भागवत, तेजोवृष जोशी (तबला), सिद्धेश बिचोलकर (संवादिनी), संदीप मिश्रा (सारंगी) हे संगीतसाथ करणार आहेत. सर्व संगीतप्रेमी रसिकांसाठी कार्यक्रमाकरिता विनामूल्य प्रवेश आहे.

  • कधी- शनिवार ११ जून आणि रविवार १२ जून २०१६
  • कुठे- बाल विकास संघ सभागृह, चेंबूर
  • केव्हा- सायंकाळी ५ वाजता (शनिवारी) आणि सकाळी ८ व सायं. ५ वाजता (रविवारी)

रागदारी आणि शंकर जयकिशन

भारतीय चित्रपटसृष्टीत अर्थात बॉलीवूडमध्ये चित्रपटातील गाण्यांना विशेष महत्त्व आहे. अनेक दिग्गज संगीतकारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा चित्रपट संगीतावर उमटविला आहे. बॉलीवूडमध्ये चित्रपट संगीतकारांच्या अनेक जोडय़ा आहेत. भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात ज्या संगीतकार जोडीने आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली त्यात ‘संगीतकार शंकर-जयकिशन’ हे एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांचे योगदान खूप मोठे असून त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. ‘जिना यहाँ मरना यहाँ’, ‘लिख्खे जो खत तुझे’, ‘रसिक बलमा’, ‘तू प्यार का सागर है’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘आजा सनम मधुर चाँदनी में हम’ या आणि अशा अनेक लोकप्रिय अन्य गाण्यांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. शंकर जयकिशन यांनी अनेक गाणी शास्त्रीय संगीतावरील रागांवरही बांधली आहेत. हृदयेश आर्ट्स प्रस्तुत ‘रागदारी आणि शंकर जयकिशन’ या कार्यक्रमातून संगीतप्रेमी श्रोते आणि शंकर जयकिशन यांच्या चाहत्यांना त्या रागांच्या प्रात्यक्षिकासह गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. अमरेंद्र धनेश्वर व सानिया पाटणकर कलाकार यात सहभागी होणार असून कैलाश पात्रा (व्हायोलिन) व मुक्ता रास्ते (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत.

  • कधी- शनिवार, ११ जून २०१६
  • कुठे- घैसास सभागृह, डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले (पूर्व)
  • केव्हा- सायंकाळी ५ वाजता

स्वरस्वयंभू

मराठी संगीत रंगभूमीवरील गायक, अभिनेते आणि संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची गायकी प्रसिद्ध गायक भरत बल्लवल्ली यांनी आपल्या गळ्यातून हुबेहूब उतरविली आहे. बल्लवल्ली यांचे गाणे ऐकताना श्रोते तल्लीन होऊन जातात, तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे गायक जयतीर्थ मेवुंडी यांनीही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या दोघांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. मॅक क्रिएशन्सतर्फे या दोघा गायकांची मैफल ‘स्वरस्वयंभू’ या शीर्षकाअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या मदतीसाठी होणाऱ्या या कार्यक्रमात भरत बल्लवल्ली आणि जयतीर्थ मेवुंडी हे गायन सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांचे आहे. या दोन्ही गायकांचे गायन ऐकणे म्हणजे संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी पर्वणी आहे.

  • कधी- शनिवार, ११ जून २०१६
  • कुठे- दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले (पूर्व)
  • केव्हा- रात्री आठ वाजता

ख्याल रंग

फर्स्ट एडिशन आर्ट्सतर्फे ‘ख्याल रंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अपूर्वा गोखले आणि केदार बोडस हे कलाकार सहभागी होणार आहेत.

  • कधी- शनिवार, ११ जून २०१६
  • कुठे- राजा शिवाजी विद्यालयाचे सभागृह, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व)
  • केव्हा- सायंकाळी ५.३० वाजता