गुजरात सरकारबरोबर सामंजस्य करार

मुंबई: शतकमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनची (डब्ल्यूआयएए) ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. या वेळी संघटनेने गुजरात सरकारबरोबर रस्ता सुरक्षा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.

डब्ल्यूआयएएची स्थापना १५ ऑक्टोबर १९१९ रोजी झाली. मेजर जनरल डब्ल्यू. डी. जेम्स हे संघटनेचे पहिले अध्यक्ष होते. संघटनेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा कुलाबा येथील ताजमहल पॅलेस हॉटेलच्या बॉलरूममध्ये झाली होती. त्याच बॉलरूममध्ये संघटनेच्या ९९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.

‘आजवरच्या ९९ वर्षांच्या कारकीर्दीत संघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी कसलीही तडजोड केलेली नाही. सामाजिक दायित्व जोपासत जबाबदार वाहन हाताळणीच्या बाजूने आम्ही उभे आहोत,’ असे डब्ल्यूआयएएकडून सभेमध्ये सांगण्यात आले.

संघटनेची स्वत:ची वाहन प्रशिक्षण संस्था पन्नास वर्षांपासून कार्यरत असून पुढील काळात पहिल्या ‘रस्ता सुरक्षा संस्थे’च्या माध्यमातून संस्थेचा कार्यविस्तार होणार आहे. या वार्षिक सभेच्या दरम्यान संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा यांनी ‘रस्ता सुरक्षा संस्थे’च्या उभारणीसाठी डब्ल्यूआयएए आणि गुजरात सरकार यांच्यामधील सामंजस्य करारावर सह्य़ा केल्या. कच्छमध्ये उभी राहणारी ही संस्था २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

संघटनेच्या ९९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिवहन आयुक्त शेखर चन्ने हे उपस्थित होते. या प्रसंगी रस्ता सुरक्षा या विषयावर नियमांचे पालन करण्याची सवय नागरिकांनी अंगी बाणवण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी त्यांच्या व्याख्यानात भर दिला.

त्याच संदर्भात डोसा म्हणाले, ‘‘वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केल्याने रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होईल. नव्याने वाहनचालक परवाना मिळवलेल्या तरुणांना वाहतुकीच्या नियमांचे पालन आपसूकच कसे करता येईल यावर भर देणारी कार्यशाळा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.’’