पश्चिम रेल्वेवर गोरेगाव स्थानकाजवळ बुधवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा झाला. बिघाड दुरुस्त झाला असला तरी वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे.

बुधवारी सकाळी गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. बिघाडामुळे चर्चगेटपासून येणाऱ्या लोकल गाड्या अंधेरीपर्यंतच धावत होत्या. अखेर सकाळी सात वाजून 50 मिनिटांनी बिघाड दुरुस्त करण्यात आला.

बिघाडामुळे गर्दीच्या वेळी काही लोकल गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आल्याची घोषणा दादर स्थानकावर करण्यात आली. तब्बल 45 मिनिटे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने पश्चिम रेल्वेवरील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.