लोकल गाडीत छत्री विसरणे किंवा रिक्षाच्या मागे ठेवलेले सामान विसरणे हा मध्यमवर्गीयांना नेहमीच येणारा अनुभव. अशा गोष्टी विसरल्यानंतर वाटणारी चुटपूट किंवा घरी गेल्यावर ऐकावे लागणारे टोमणेही पटकन आठवतात. पण अमिताभ बच्चन यांनाही हाच अनुभव आला तर त्याची निश्चितच बातमी होते. फ्लोरेन्समध्ये एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेले अमिताभ तेथील हॉटेलमध्ये लॅपटॉप विसरून चक्क विमानात बसले आणि इस्लेसला जाऊन पोहोचलेही. सुदैवाने त्यांच्या कंपनीची काही माणसे फ्लोरेन्सलाच असल्याने त्यांनी तो लॅपटॉप ताब्यात घेतला. पण साधे पेन विसरले, रुमाल कुठे राहिला तरी चुटपूट लागणाऱ्या तुमच्याआमच्यासारखीच चुटपूट लॅपटॉप विसरल्यामुळे अमिताभनाही लागली. आपली अस्वस्थता त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
अमिताभ गेले काही दिवस फ्लोरेन्समधील ‘रिव्हर टू रिव्हर २०१२ इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ते इस्लेस येथे जाणार होते. याच प्रवासात ते आपला लॅपटॉप फ्लोरेन्सच्या हॉटेलातच विसरले. त्यानंतर ट्विटरवर त्यांनी आपली अस्वस्थता मोकळेपणे मांडली. माझ्याबरोबर असलेल्या माझ्या मदतनीसाने माझा लॅपटॉप बरोबर घेतलाच नाही. आणि ही गोष्ट मला इथे आल्यानंतर कळली. या गोष्टीमुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे. जग दुरावल्यासारखे वाटत आहे. मात्र नशिबाने माझा एक सहकारी फ्लोरेन्समध्येच असल्याने त्याने माझा लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. मात्र आता तो मला थेट मुंबईत घरी पोहोचल्यावरच मिळेल, असे अमिताभने ट्विटरवर लिहिले आहे.
इस्लेसला पोहोचल्यानंतर तेथील हॉटेल चालकांनी अमिताभला एक मॅकिंटॉश कॉम्प्युटर वापरायला दिला. त्या मॅकवरूनच अमिताभने ट्विट करून लॅपटॉप विसरल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या.