07 March 2021

News Flash

शहरबात : बिबटय़ा शहरात दिसतो तेव्हा..

भटके बिबटे दिसणार का याचे उत्तर नसले तरी भटकी कुत्री असेपर्यंत बिबटे दिसू शकतात हे मात्र नक्की.

(संग्रहित छायाचित्र)

रसिका मुळ्ये

ठाण्यात एका मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबटय़ाची नोंद झाली आणि जंगलापासून अंमळ दूर असलेल्या या भागापर्यंत बिबटय़ाची वर्दी आल्यामुळे तो पकडेपर्यंत चर्चा, भीती आणि बिबटय़ा दर्शनाची उत्साहवर्धक घाई ठाणे शहरभर पसरली. पुढे माध्यम आणि वृत्तवाहिन्यांच्या विद्युतगती वेगामुळे बिबटय़ाचा मानवी वस्तीतला वावर आणि त्याहूनही मॉलचा फेरफटका गमतीचा विषय झाला.

बिबटय़ाने फेरफटका मारल्यामुळे वनाधिकाऱ्यांसह अनेक बघ्यांच्या काही कॅलरीज कमी केल्या असल्या, तरी अखेर हार पत्करत तो स्वाधीन झाला. कोणालाही इजा न करता बिबटय़ाला पकडण्यात यश आले. अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण खरे तर अतिउत्साही अर्धवटराव बघ्यांनी इतका गोंधळ घालूनही बिबटय़ाने शांतपणे लपण्याचा पर्याय निवडला याबद्दल त्या बिबटय़ाचे आभारच मानायला हवेत.

ठाण्याच्या घटनेपूर्वी नाशिक येथे गंगापूर रस्ता परिसरात, भरवस्तीत पकडण्यात आलेला बिबटय़ा हाही बातम्या, चर्चा आणि समाज माध्यमांद्वारे एकमेकांना ध्वनिचित्रफिती पाठवून विरंगुळ्याचा विषय ठरला. फेब्रुवारीचा पहिला आठवडा बिबटय़ाने पुणेकरांची त्रेधा उडवली. या सततच्या घटनांनी ‘वनविभाग बिबटय़ांना आवरायला अपुरा पडतो आहे का? ‘, ‘राज्यभर बिबटय़ाचा हाहाकार.. वगैरे’, ‘पहिल्यांदा मीच बिबटय़ा कसा पहिला असे सांगणाऱ्या डझनभर शूरवीरांचे कथन’, ‘शहरात बिबटय़ा आलाच कसा’ या प्रश्नापासून ते विनोदांपर्यंत .. समाज माध्यमाच्या चावडीवरील चर्चा अजूनही पुरत्या थंडावलेल्या नाहीत.

ऐन निवडणुकीच्या मोसमात ‘अमुक विरुद्ध अमुक’ अशा मनोरंजक कार्यक्रमांची जागा समाज माध्यमांवर ‘बिबटय़ावाले आणि बिबटय़ा नकोवाले’ यांच्यातील हिरिरीच्या चर्चानी घेतली आहे. या सगळ्याचा परिपाक हा आता भटक्या कुत्र्यांसारखे भटके बिबटे शहरात दिसू लागणार का या विचारावर येऊन पोहोचतो. आता भटके बिबटे दिसणार का याचे उत्तर नसले तरी भटकी कुत्री असेपर्यंत बिबटे दिसू शकतात हे मात्र नक्की.

बिबटय़ा दिसणे ही गोष्ट तशी काही नवखी नाही. वर्तमानपत्रातील बातम्या वरवर चाळल्या तरी साधारण दर दिवसाआड राज्यात कुठेतरी बिबटय़ा माणसाला हाय-बाय करून जातो. बिबटय़ा मनुष्यवस्तीत का येऊ  लागला या गेली काही दशके चर्चिल्या जाणाऱ्या प्रश्नाचे ‘जंगलांचे क्षेत्र कमी झाल्यामुळे, बिबटय़ाचा अधिवास धोक्यात आला आणि तो मनुष्यवस्तीकडे येऊ  लागला’, हे परिसर अभ्यास पुस्तकछापाचे उत्तरही सर्वज्ञात आहे. त्यामुळे बिबटय़ा दिसला, यापेक्षा तो शहरात दिसला हा मुद्दा अधिक अचंब्याचा ठरला. आता रस्त्यावर साधे वाहतुकीचेही नियम न पाळणाऱ्या माणसाने बिबटय़ाने मात्र त्याच्या हद्दीचे नियम पाळावेत अशी अपेक्षा करणे अंमळ अधिकच झाले ना.. गमतीचा भाग वगळता प्रश्न आणि उत्तरे दोन्ही माहीत असूनही बिबटय़ाने घेतलेली परीक्षा माणसाला कायमच कठीण वाटते. त्याचे एकमेव कारण म्हणते समज, संयम, सामाजिक शिस्तीचा अभाव.

२००४-५ च्या दरम्यान बिबटय़ांचे बोरिवली येथील मानवी वसाहतींमध्ये सर्वाधिक हल्ले झाले होते. त्यानंतर ठाणे, बोरिवली शहरांच्या राष्ट्रीय वनसीमांच्या जागांवर मानवी वस्त्यांचे प्रमाण चार ते पाच पटींनी वाढलेले आहे. मुळात आपणच त्यांच्या निवासक्षेत्रात आक्रमण करून वर बिबटय़ाला जंगलाच्या आणखी आत जाण्यास भाग पाडले. बिबटय़ा शहरात दिसणे हे नवखे असले तरी तो शहरात येणे यात नवे काही नाही. मुळात हा प्राणी परिस्थिती आणि त्यातील बदल स्वीकारण्यात तरबेज आहे. जंगलाचे क्षेत्र कमी होत असताना परिस्थितीशी संघर्ष करत त्याने मनुष्यवस्तीच्या जवळ राहण्याशी जुळवून घेतले. तरीही माणसापासून लांब राहण्याची हुशारीही त्याने दाखवली. शहरात येतो, फिरतो माणसाच्या नजरेस न पडता परत जातो, असा अनेक भागात बिबटय़ाचा शिरस्ता असू शकेल. अगदी मोठय़ा घुशीपासून ते कुत्र्यांपर्यंत मिळेल त्या प्राण्यांची शिकार करून तो राहतो. बिबटय़ा आला ही समस्या नसते तो ‘दिसला’ ही गोष्ट मात्र समस्येचं रूप धारण करते.

एखाद्या भागात विशेषत: शहरी भागात बिबटय़ा दिसला अशी वार्ता जराजरी पसरली की हवशा-गवशांची गर्दी उसळते. आता बिबटय़ा हा काही परग्रहावरचा, कधीही न दिसणारा वगैरे प्राणी नाही. प्राणिसंग्रहालय, राष्ट्रीय उद्यानात अगदी तासन्तास निवांतपणे बिबटय़ा पाहता येतो. काहीवेळा या गर्दीच्या मोहात ‘आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं’ अशा आविर्भावातील लोकप्रतिनिधी अति उत्साहात परीक्षा अधिक कठीण करून ठेवतात. मानवी व्यवहारातील या कंगोऱ्यांची जाणीव नसलेला बिबटय़ा गोंधळाला वैतागून एखाद्याला आपल्या पंजाचा तडाखा लागवतो आणि ‘खलनायक’ ठरतो.

ठाण्यात पकडलेल्या बिबटय़ाने कुणाला इजा केली नाही. मात्र अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठीची, त्याकडे पाहण्याची प्रगल्भता आपल्या मेंदूत कशी अजिबातच नाही, याचा उत्तम नमुना ठाण्यातही दिसून आला. नाशिक आणि पुण्यातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. ठाण्यातील बिबटय़ा पकडताना जे सहज, शांतपणे शक्य झाले असते, ती परिस्थिती गर्दी आणि बेशिस्तीने बिकट केली. बिबटय़ाला नेण्यासाठी आणलेला पिंजरा परस्पर दुसरीकडेच हलवण्यापर्यंत सारासारविचार करण्याची क्षमता खालावली. एखाद्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची चर्चा झाली तर सामान्यपणे त्या ठिकाणापासून आपण दूर जाऊ  की बॉम्ब कसा आहे ते पाहायला पुढे पुढे जाऊ? मग आलेला बिबटय़ा बिथरला तर काय घडू शकते याची कल्पना असताना, अनेक उदाहरणे समोर असताना छायाचित्रे काढून समाज माध्यमांवर झळकवण्याचा एवढा अट्टहास का?

बिबटय़ा येणार, तो येतच राहणार. हे स्वीकारणे या सगळ्यावरील पाहिले उत्तर आहे. बिबटय़ासाठी जंगलात पुरेसे खाद्य आहे. मात्र कुत्री पकडणे हे त्याच्यासाठी अधिक सोपे आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांमागे बिबटय़ा शहरात येणे साहजिक आहे, असे निरीक्षण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डॉ. शैलेश पेठे यांनी मांडले आहे. बिबटय़ा दिसल्यानंतर काय करायचे याचे प्रशिक्षण नागरिकांना देणे मात्र गरजेचे आहे. बिबटय़ा, त्याच्या सवयी यांबाबत चर्चा खूप होतात. मात्र त्याचे निष्कर्ष बहुत करून ढोबळच असल्याचे दिसते. यावर अधिक संशोधन होणे आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. बिबटय़ाची सर्वार्थाने नागरिकांना ओळख करून दिल्यास त्याबाबतची फाजील उत्सुकता आटोक्यात येईल, याची जाण व्यवस्थेनेही ठेवणे गरजेचे आहे. बिबटय़ाबाबतच्या भीतीबरोबरीने संघर्ष वाढवण्यापेक्षा बिबटय़ा आणि माणसाचे सहजीवन वाढवाण्याच्या दृष्टीने उपाय होणे आवश्यक आहे. जुन्नरसह अनेक भागात हे प्रयोग झाले आहेत. आता शहरातही ते व्हायला हवेत..कारण बिबटय़ा आता ‘दिसलाय.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 3:36 am

Web Title: when the leopard appears in the city
Next Stories
1 मराठा आरक्षण रद्द करण्याची ओबीसींची मागणी
2 सफाई कामगारांचे ‘शासन निर्णय वापसी’ आंदोलन
3 ऊसतोड कामगारांच्या मुलांची विमानवारी
Just Now!
X