ममता, जयललिता यांची कसोटी; भाजपला फक्त आसाम फायद्याचे

दिल्ली आणि बिहारमध्ये सत्ताधाऱ्यांच्या बाजूने पुन्हा कौल मिळाल्याने पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभेच्या यशानंतर एकापाठोपाठ राज्ये काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली असली, तरी पाचपैकी आसामवगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपसाठी सत्तेचे गणित जुळणे कठीण मानले जाते.
तामीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पॉण्डेचेरी या पाच राज्यांच्या निवडणुका पुढील जून महिन्यापर्यंत होणार आहेत. सलग चार विजयाने भाजपचा वारू चौफेर उधळला होता, पण दिल्ली व आता बिहारच्या पराभवाने भाजपला धक्का बसला. तामीळनाडूमध्ये जयललिता आणि करुणानिधी या पारंपरिक विरोधकांमध्येच लढाई आहे. केरळप्रमाणेच अलीकडे तामीळनाडूमध्ये सत्ताधाऱ्यांना पुन्हा यश मिळत नाही हे स्पष्ट झाले आहे. करुणानिधी यांचे वय, द्रमुक अंतर्गत भांडणे यामुळे जयललिता पुन्हा सत्तेची स्वप्ने रंगवीत आहेत.
तामीळनाडूमध्ये पाय पसरण्याचा प्रयत्न भाजपने केला असला, तरी अजून तेवढे यश मिळालेले नाही. मोदी लाटेत कन्याकुमारीची जागा भाजपने जिंकली असली, तरी द्राविडी राजकारणात भाजपला अद्यापही बस्तान बसविता आलेले नाही. काँग्रेसचीही अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या उत्तम संबंधांमुळेच जलललिता नेहमीच भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतात. सत्तेसाठी करुणानिधी बिहारच्या धर्तीवर समविचारी पक्षांची मोट बांधण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या जयललिता यांची कसोटी लागणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पकड बसविली आहे. अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ममता यांच्या तृणमूल काँग्रेसला यश मिळाले. डाव्या पक्षांची पकड सैल होत गेली. काँग्रेसही भरकटलेल्या अवस्थेत आहे. भाजपने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला असला, तरी तेवढा जम बसविता आलेला नाही. ममता यांच्यासाठी वातावरण अनुकूल असून, पुन्हा सत्ता हस्तगत करतील, अशी चिन्हे आहेत.
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये भाजपने हातपाय पसरले आहेत. सत्तेतील पक्ष पुन्हा निवडून येत नाही ही केरळची परंपरा कायम राहील, असे आजचे चित्र आहे. डाव्या आणि भाजपच्या मतांच्या विभाजनाचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. डाव्यांसाठी ‘करो वा मरो’ अशी ही निवडणूक आहे.
आसाममध्ये १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या विरोधात नाराजी वाढत आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी आणि अल्पसंख्याकांची वाढती लोकसंख्या या मुद्दय़ांवर भाजपने जाणीवपूर्वक मतांचे ध्रुवीकरण आतापासून सुरू केले आहे. काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हेमंत बिश्वास शर्मा व त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे.
बिहारप्रमाणेच समविचारी पक्षांचे विभाजन टाळण्याकरिता तसेच भाजपला रोखण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि ‘अत्तरकिंग’ अजमल बद्रुदिन यांच्या पक्षाने एकत्र यावे, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या पाच राज्यांपैकी आसाममध्येच भाजपला सत्ता मिळण्याची संधी आहे. पॉण्डेचेरीमध्ये अण्णा द्रमुक, काँग्रेस किंवा स्थानिक पक्षांमध्ये लढत होते. बिहार आणि दिल्लीमध्ये प्रस्थापितांनी सत्ता कायम राखल्याने या पाचही राज्यांमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांमध्ये विश्वास वाढला आहे.