देशात लोकांचं सरकार नाही तर EVM चं सरकार आहे. त्याचमुळे राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरेंनी सगळ्या पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं त्याचमुळे आता त्यांना ईडीची नोटीस पाठवली गेली आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला. तसेच राज ठाकरे यांच्यासोबत आम्ही सगळेच जण आहोत. ईडीची नोटीस नेमकी आत्ताच का पाठवली? असाही प्रश्न विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रात सत्तेवर बसल्यानंतर आता राज्यातही भाजपाला सत्ता हवी आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे सगळ्या पक्षांना एकत्र आणून जो मोर्चा काढत आहेत तो सरकारला काढू द्यायचा नाही म्हणून हे दडपशाहीचे धोरण सुरु आहे असंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. विद्या चव्हाण यांनी आज कृष्णकुंज या ठिकाणी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. त्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांची आणि पक्षाची भूमिका जाहीर केली. तसेच आम्ही सगळेचजण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज ठाकरेंच्या पाठिशी आहेत. राज ठाकरे कुणालाही भीक घालत नाहीत त्यामुळे या नोटीशीलाही ते भीक घालणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावताच काँग्रेसनेही सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार दडपशाही करण्याच्या प्रयत्नात आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. तर आता राष्ट्रवादीनेही राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. तर अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असा टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे.