संपूर्ण देशात आंबे लवकर पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड हे संयुग वापरले जाते. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का?, कॅल्शिअम कार्बाईड (CaC2) हे संयुग अॅसेटिनेल गॅस, कार्बाइडचे दिवे, खत रसायनांचे उत्पादन आणि स्टील बनवण्यासाठी वापरण्यात येते. त्याचप्रमाणे खेळण्यातल्या तोफा आणि नौदलात छोट्या आगी भडकवण्यासाठी वापरले जाते. आंबे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा सर्रास वापर करण्यात येत असल्यामुळे आंब्याच्या खोक्याजवळ आग नेणे योग्य नाही, त्यामुळे आगीचा भडका उडण्याची शक्यता असते.  

फळे पिकवण्यासाठी ज्याप्रमाणे वनस्पतींद्वारे इथिलीन वायू उत्पादित केला जातो त्याप्रमाणे कॅल्शियम कार्बाईडचा पाण्याशी संपर्क येतो तेव्हा तो अॅसेटिनेल गॅस बाहेर टाकतो. कृत्रिमरित्या फळे पिकवताना कॅल्शियम कार्बाईड हे आर्सेनिक आणि फॉस्फरस हायड्रॉईडची निर्मिती करते. कॅल्शियम कार्बाईडमध्ये कर्करोग बळावणारे गुणधर्म असून त्यामुळे उलट्या होणे, अतिसार आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणेही दिसून आली आहेत. त्यामुळे अशा रसायनांचा शरीरावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून फळे खाण्याआधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पाहिजेत.

कॅल्शिअम कार्बाईडला फळांच्या बाजारात ‘मसाला’ असे संबोधण्यात येते. विशेष म्हणजे, ह्याच कॅल्शिअम कार्बाईडवर १९५५ च्या पीएफए आणि अन्न सुरक्षा मानांकन (विक्री वर बंदी आणि नियंत्रण) २०११ च्या नियमानुसार बंदी घालण्यात आली आहे.

केरळमधील कोझीकोडे विमानतळाजवळील करिप्पूर येथून मागवण्यात आलेल्या आंब्यांना लवकर पिकविण्यासाठी लावण्यात लावण्यात आलेले कॅल्शिअम कार्बाईड कशाप्रकारे पेट घेते हे खालील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.