मुंबई : लोककलांच्या सदरीकरणादरम्यान वापरण्यात येणारे पोशाख, वाद्ये आणि इतर वस्तूंचे संग्रहालय उभारण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात केली. यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना हा पुरस्कार देण्यात आला.

सांस्कृतिक संचालनालयातर्फे तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. गतवर्षीचे विजेते मधुकर नेराळे यांच्या हस्ते तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवेबद्दल मोमीन यांना हा पुरस्कार देण्यात आला असून ५ लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी  महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे उपस्थित होत्या.

या वेळी राज्य सांस्कृतिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले. नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी माधुरी ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प. विनोदबुवा खोंड, शहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी माणिकबाई रेंनके, आदिवासी गिरीजनासाठी वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं. प्रभाकर धाकडे, तमाशासाठी चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादालनासाठी श्रीकांत धोंगडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकार अभिराम भडकमकर, योगेश समसी, प्रकाश खांडगे आणि संध्या पुरेचा यांचादेखील सत्कार या समारंभात करण्यात आला.

लवकरच समितीचे गठन

या वेळी तावडे म्हणाले, ‘लोककलांच्या सादरी करणासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या संग्रहालयामुळे सांस्कृतिक ऐवजाचे जतन होणार आहे. लवकरच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने एक समिती गठीत करून या विषयावर अभ्यास करून हे संग्रहालय उभारणार येईल. महाराष्ट्रातील लोककलांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. तमाशा म्हणजे एकत्रित आविष्कार आहे. तमाशाकडे केवळ मनोरंजन न बघता, समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नृत्यकलेचा हा वेगळा आविष्कार आहे.