प्रतिजैविकांच्या बाधेमुळे प्रकृती बिघडलेल्या, कुल्र्याच्या भाभा रुग्णालयातील २८ महिलांपैकी सायरा शेख (४६) हिचा मंगळवारी रात्री उशीरा मृत्यू झाला. या महिलांना देण्यात आलेल्या प्रतिजैविकांचा वापर पालिका रुग्णालयात तूर्तास थांबवण्यात आला असला तरी याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या चाचणीचा अहवाल आठवडाभराने आल्यानंतर वस्तुस्थिती कळेल, अशी ‘आस्तेकदम’ भूमिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.
भाभा रुग्णालयातील प्रतिजैविक इंजेक्शनच्या बाधेमुळे सायरा यांना अन्य १४ महिलांसह केईएममध्ये दाखल करण्यात आले होते. विषमज्वर झाल्याने भाभा रुग्णालयात ती दाखल होती आणि तिची प्रकृती सुधारत होती. सोमवारी रात्री मात्र इतर महिलांसोबत सायरा शेख यांनाही डोके दुखणे, चक्कर येणे, श्वास कोंडण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना केईएममध्ये दाखल केल्यावर तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. रक्तदाब कमी होत असल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली व मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे प्रतिजैविकाच्या अ‍ॅलर्जी घटनेने गंभीर वळण घेतले आहे. पालिका मात्र या प्रकरणाबाबत अद्यापही गंभीर नाही. केईएममध्ये तसेच शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अन्य सर्व महिला रुग्णांची प्रकृती ठीक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
भाभा रुग्णालयात महिलांना देण्यात आलेली प्रतिजैविके पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडूनच आली होती. ही इंजेक्शन जुलै महिन्यापासून देण्यास सुरुवात झाली. त्यांची कोणतीही बाधा झालेली नव्हती. तसेच ही इंजेक्शन योग्य पद्धतीने ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्राथमिक चौकशीअंती कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकेचा दोष आढळलेला नाही, असे प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांच्या संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांनी स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाकडून या इंजेक्शनच्या रासायनिक चाचणीचा अहवाल आठवडाभरानंतर येईल, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. दरम्यान केईएम, नायर व शीव रुग्णालयातील मेडिकल तसेच ट्रॉमा केअरमधील तज्ज्ञांची समिती या इंजेक्शन व त्यावरील अ‍ॅलर्जीबाबत तपास करतील, असेही नागदा म्हणाल्या.
कारवाईची मागणी
महिलांना सेफ्ट्रायअ‍ॅक्सोल आणि सेफोटॅक्झाइन या दोन प्रकारची प्रतिजैविक (अ‍ॅण्टिबायोटिक्स) इंजेक्शन देण्यात आली होती. या इंजेक्शनबाबत तपासणी पूर्ण होईपर्यंत तूर्तास पालिका रुग्णालयात ही इंजेक्शन वापरली जाणार नसल्याने प्रशासनाने स्पष्ट केल्याचे स्थायी समिती सदस्य डॉ. अनुराधा पेडणेकर म्हणाल्या. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करावा. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.