रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास महानगरामधील रहिवाश्यांसाठी काही नवीन नाही. असे असले तरी या भटक्या कुत्र्यांना नियमीतपणे खाऊ घालणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. मात्र अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांवरील प्रेम मुंबईमधील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याने कांदिवलीमधील ‘द निर्सग हेवन सोसायटी’ने एका महिलेला चक्क ३ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला आहे. जाहिरात क्षेत्रात काम करणारी ही माहिला प्राणी प्रेमी असून ती नियमीतपणे सोसायटीच्या आवारात कुत्र्यांना खाऊ घातल असल्याने सोसायटीने हा निर्णय घेत तिला दंड ठोठावला आहे.

याप्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सोसायटीचे अध्यक्ष मितेश बोरा यांनी अधिक माहिती दिली. ‘सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात यावा असा ठराव सोसायटीमधील ९८ टक्के सभासदांनी एकमताने संमत केला आहे. सोसायटीचा अध्यक्ष असल्याने सोसायटीमधील बहुतांश सभासदांनी तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य आहे. सोसायटीमधील प्राणी प्रेमींनी सोसायटीच्या आवाराबाहेर भटक्या कुत्र्यांना खायला घातल्यास त्याबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाहीय. आम्हालाही प्राण्यांबद्दल प्रेम आहे. प्राण्यांच्या हक्काविरोधात वागण्याची आमचीही इच्छा नाही. मात्र ते करताना मानवी हक्कांचेही संरक्षण करायला हवे,’ असे मत बोरा यांनी नोंदवले.

‘सोसायटीच्या आवारात ज्या भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाते ते कुत्रे सोसायटीमधील वयस्कर व्यक्तींवर, लहान मुलांवर मोठ्याने भुंकतात. या कुत्र्यांमुळे सोसायटीचा परिसर अस्वच्छ होतो. या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाच्या अनेक तक्रारी मिळाल्यानंतरच सर्व सभासदांनी मिळून नवीन नियम तयार केले आहेत,’ असं बोरा सांगतात.

सोसायटीच्या नवीन नियमांनुसार दंड ठोठावण्यात आलेल्या नेहा दातवाणी यांनी, ‘मला मार्च महिन्यापर्यंत मेंटेन्सची थकित रक्कम पकडून एकूण ३ लाख ६० हजारांची पावती सोसायटीने दिली आहे. यामध्ये भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खायला घातल्याप्रकरणी ७५ हजारांचा दंड ठोठावला आहे. दिवसाला अडीच हजार याप्रमाणे महिन्याभरासाठीचा दंड मला ठोठावण्यात आला आहे. जुलै २०१८ मध्ये मला सोसायटीने दिवसाला अडीच हजारांचा दंड ठोठावला होता. एका महिन्याच्या दंडाची रक्कम ७५ हजार इतकी झाली आहे. सोसायटीमधील दुसरे एक सभासद केतन शहा यांनाही सोसायटीने ७५ हजारांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भात मी प्राण्यांच्या हक्कांचे संवर्धन करणाऱ्यांकडे गेली असता सोसायटीने दंड आकारणे बंद केले. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही’, असंही नेहा म्हणाल्या.

‘ज्या कुत्र्यांना भटकी कुत्रे म्हटले जात आहे त्या कुत्र्यांचा जन्म सोसायटीच्या आवारातच झाला आहे. त्यांच्या जन्मापासून मी त्यांची देखभाल करत आहे. मात्र अचानक सोसायटीने एका समितीची स्थापना करुन कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांकडून दंड आकारण्याचा निर्णय घेतला. मी मानवतेच्या दृष्टीकोनातून या कुत्र्यांना खाऊ घातले,’ अशा शब्दांमध्ये नेहा यांनी आपला बचाव केला आहे. तसेच सोसायटीची सर्व रक्कम देऊन मी लवकरच कायमची मुंबईबाहेर जाणार आहे. मी जाणार असले तरी माझी आई आणि बहीण येथेच राहणार आहेत असं सांगतानाच आपण दंडाची इतकी मोठी रक्कम सोसायटीला देणार नसल्याचेही नेहा यांनी स्पष्ट केले आहे.