नागपाडा येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गुरुवारी सायंकाळी लागलेल्या आगीत एक महिला ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. नागपाडय़ातील मौलाना शौकत अली रोडवरील चौकी मोहल्ल्यातील सुलेमान इमारत क्र. ८१च्या पहिल्या मजल्यावरील एका घरात गुरुवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब, पाण्याचे तीन टँकर आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांशी शर्थ करीत पावणेदोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत अमरिन कुरेशी (२६) ही महिला ठार, तर साजिदा काझी दमानी (६५) ही महिला गंभीर जखमी झाली.