मुंबई : इंस्टाग्राम आणि विवाह जुळणी संकेतस्थळाद्वारे ओळख वाढवून फसवणूक करणाऱ्या भामटय़ांविरोधात मुंबईतील दोन महिलांनी पोलीस तक्रार केली आहे. यापैकी एका महिलेला भामटय़ाने स्वत:ची ओळख राज्य दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी अशी करून दिली होती.

अंधेरीत राहणाऱ्या तरुणीची तीन आठवडय़ांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे एका तरुणासोबत ओळख झाली. त्याने आपले नाव अलेक्झांडर मार्टीनेज असे सांगून ब्रिटन येथील ग्लोबल ऑइल अ‍ॅण्ड गॅस कं पनीत अभियंता असल्याचे सांगितले. या दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संवाद सुरू झाला. तरुणीच्या तक्रोरीनुसार अलेक्झांडरने प्रेमभावना व्यक्त के ली. तसेच एक भेटवस्तू पाठवत असल्याचे कळविले. महागडय़ा वस्तू, उपकरणे आणि ८५ हजार पाऊंडची भेटवस्तू असून तिच्यासाठी ४५ हजार रुपये सीमाशुल्क भरावे लागेल, असे सांगितले. लगोलग दिल्ली विमानतळावरून सीमाशुल्क विभागातील अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेने तक्रारदार तरुणीशी संपर्क साधला. भेटवस्तू सोडण्यासाठी ४५ हजार रुपये सीमाशुल्क आणि त्यातील ८५ हजार पाऊंड म्हणजेच परकीय चलनासाठी दंड म्हणून एक लाख रुपये भरण्यास सांगितले. तरुणीने ही रक्कम भरली. मात्र त्यानंतरही निरनिराळ्या कारणांसाठी तिच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. तिने अलेक्झांडरशी संपर्क साधला. त्याने ८५ हजार पाऊंड म्हणजेच ८० लाखांहून जास्त रुपये हाती पडणार असल्याने त्यासाठी थोडा खर्च करावाच लागेल, असा सल्ला तरुणीला दिला. तो मानून तिने एकू ण चार लाख रुपये भरले. मात्र त्यानंतरही पैशांची मागणी सुरू राहिल्याने तिला संशय आला. तिने पैसे देणे थांबवले. त्यानंतर अलेक्झांडरनेही या तरुणीसोबतचा संपर्क तोडला.

अन्य प्रकरणात शासकीय कार्यालयात कनिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत महिलेने विवाह जुळणी संकेतस्थळावर नोंदणी के ली होती. त्यावर तिची एका तरुणासोबत ओळख झाली. त्याने एटीएसचा अधिकारी असल्याचे भासवले. काही दिवसांनी त्याने महिलेकडे घराचा हप्ता भरण्यासाठी २५ हजार रुपये मागत मित्राच्या बँक खात्याचे तपशील दिले. महिलेने २० हजार रुपये त्या खात्यावर भरल्यानंतर त्याने पुन्हा १० हजार रुपयांची मागणी के ली.त्यानंतर या तरुणाने महिलेशी संवाद तोडला.