लोहमार्ग पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण निवळले; मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मंगळवार सकाळची घटना
कसाऱ्याहून निघालेल्या एका गाडीतील महिलांच्या डब्यातील पंख्यातील बिघाडाचे पर्यवसान या डब्यातील महिला व गाडीचा मोटरमन यांच्या भांडणात झाले. या भांडणात मोटरमन लॉबीतील इतर मोटरमेननी सहभाग घेतल्यानंतर या बाचाबाचीने गंभीर वळण घेतले. अखेर हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी या उभय पक्षांमध्ये समेट घडवून आणला. मात्र हे भांडण चालू असताना मोटरमननी ‘काम बंद आंदोलन’ करण्याची भाषा केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या सकाळच्या एका जलद गाडीतील महिला डब्यातील एक पंखा प्रचंड आवाज करत फिरत होता. हा पंखा भयानकरीत्या हलत असल्याने या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या मनात भीती होती. त्यांनी डब्यातील बटणांद्वारे तो बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी १३८ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यावर कल्याण स्थानकात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी चिकटपट्टीच्या साहाय्याने हा पंखा चिकटवला. दरम्यान, गाडीतील महिला उतरणाऱ्या महिलांना ‘मोटरमनला पंखे बंद करण्यास सांगा,’ असे सांगत होत्या, पण या महिला प्रवासी मोटरमन केबिनकडे जाईपर्यंत गाडी सुटत होती. अखेर गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचल्यावर या डब्यातील सरोज देशपांडे यांनी मोटरमनला जाब विचारला. मात्र मोटरमनने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने देशपांडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांचा पारा चढला. त्यांनी मोटरमनला त्याचे नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. त्या वेळी देशपांडे यांनी या मोटरमनचे छायाचित्र काढले. इतर मोटरमनही येथे आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. काही महिला प्रवाशांच्या म्हणण्याप्रमाणे मोटरमननी महिलांना धक्काबुक्की करीत ‘काम बंद आंदोलन’ करण्याची भाषा केली. हे प्रकरण अखेर लोहमार्ग पोलिसांकडे गेले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. मात्र या उभय पक्षांत समेट घडवून देत तक्रार न नोंदवता या प्रकरणाची नोंद करून घेतली.