News Flash

मनसोक्त भटकंती.. पण एकटीने!

बाईच्या जातीने एकटय़ाने प्रवास करू नये, घरचे बरोबर असतील तरच महिलांनी प्रवासाला बाहेर पडावे इ. इ. ‘सुविचार’ अनेकांना, विशेषत पुरूषप्रधान संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांना, तोंडपाठ असतात.

| March 8, 2015 04:44 am

बाईच्या जातीने एकटय़ाने प्रवास करू नये, घरचे बरोबर असतील तरच महिलांनी प्रवासाला बाहेर पडावे इ. इ. ‘सुविचार’ अनेकांना, विशेषत पुरूषप्रधान संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांना, तोंडपाठ असतात. मात्र, हे ‘सुविचार’ उधळून लावत, पाठीवर मस्तपैकी बॅग लटकवत एकटय़ाने फिरायला बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे. एकटय़ाने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांचे प्रमाण सहा टक्के एवढे असल्याची बाब पर्यटन संस्थांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. त्यातही अहमदाबाद, दिल्ली आणि बेंगळुरू या शहरांमधील महिला या बाबतीत पुढे आहेत.
या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ६६ टक्के महिलांनी देशभरात कुठेही फिरण्यासाठी असुरक्षितता वाटत नसल्याचे मत नोंदवले. कुटुंबाबरोबर फिरण्यापेक्षा एकटय़ाने भ्रमंती करणे जास्त आवडते, असे सांगणाऱ्या महिलांची संख्याही मोठी असून ५३ टक्के महिलांनी एकटय़ाने प्रवास केला होता, असे लक्षात आल्याचे ‘मेक माय ट्रिप’चे प्रमुख रणजीत ओक यांनी सांगितले.
एकटय़ाने फिरताना कुटुंबाच्या जबाबदारीचे दडपण नसल्यामुळे अधिक शांतपणे पर्यटनाचा अनुभव घेता येतो. त्यांना आपल्याला हवे तेच, हवे तेवढा वेळ फिरण्याचे स्वातंत्र्य असते, असे मत नेहमीच एकटय़ाने पर्यटन करणाऱ्या ऐश्वर्या गंधे यांनी सांगितले.
मुंबईतूनच फ्रेंच भाषा शिकून दुभाषी म्हणून एका कार्यक्रमांतर्गत फ्रान्सला पोहोचलेली रीमा धरणे तिथे राहून आपली एकटय़ाने पर्यटन करण्याची हौसही पूर्ण करते आहे. इंटरनेटमुळे एका क्लिकसरशी तुम्हाला जगभरात कुठे, कसे पोहोचायचे याची माहिती मिळते. ट्रॅव्हल ब्लॉग्ज, ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्या यांच्या मदतीने तुम्ही एकटय़ा जगभरात कुठेही जायचे नियोजन करू शकता, असे रीमाने सांगितले. आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काय काळजी घ्यायला हवी, याची जाणीव एक पर्यटक म्हणून असलीच पाहिजे. तिथे स्त्री-पुरुष असा विचार करून चालत नाही, असे तिने सांगितले.

एकटय़ाने पर्यटन करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात यंदा मोठी वाढ अपेक्षित आहे. गेल्या चार वर्षांमध्ये महिला पर्यटकांचे प्रमाण१० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळले आहे. धार्मिक स्थळांबरोबरच गोवा, कूर्ग, अंदमान, उटी, मुन्नार, मनाली येथे नियमितपणे पर्यटन करणाऱ्या महिला आहेत. पुरुष पर्यटकांपेक्षा महिला १५ टक्के अधिक खर्च करतात.
– हरी नायर, हॉलिडे आयक्यू या संस्थेचे प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 4:44 am

Web Title: womens day special
टॅग : Womens Day
Next Stories
1 शोकप्रस्तावासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे
2 महाराष्ट्र सदन प्रकरणात लाच दिल्याचे अस्पष्ट!
3 गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समिती स्थापणार- विनोद तावडे
Just Now!
X