पाल्र्यातील तंजावूर नृत्यशाळेतील विद्यार्थिनींना इटलीत पुरस्कार

विलेपार्ले येथील प्रसिद्ध ‘तंजावूर नृत्यशाळा’ या संस्थेला थेट ‘वल्र्ड चॅम्पियनशिप ऑफ डान्स’ या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. इटली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड कप ऑफ फोकलोर २०१९’ या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात त्यांनी ‘प्रिझर्वेशन ऑफ कल्चर’ हा खास मानाचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारामुळेच त्यांना ‘वल्र्ड चॅम्पियनशिप ऑफ डान्स’ या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे.

इटली येथील लिडो द जेसोलो येथे १८ वा ‘वर्ल्ड कप ऑफ फोकलोर २०१९’ हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या नृत्यमहोत्सवात रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, युक्रेन, हंगेरी आणि इतर अनेक देशांच्या २१ नृत्य चमूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये तंजावूर नृत्यशाळेने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या नृत्यशाळेच्या वैष्णवी लिमन, निधी गुप्ते, सई रानडे, नेहा इखे, निशिता राणे, पृथा मिठे, अनन्या कोळस्कर, सई धुरी, सृष्टी घाग, रेवती देशमुख, सानिका सरदेसाई, हर्षिता वासुदेव, तेजस भागवत, गीता भागवत आणि सौम्या ओन्या या १५ विद्यार्थिनींनी या महोत्सवात नृत्य सादर केले.

भरतनाटय़ममधील ‘कुरुवंजी’ नृत्यप्रकार या चमूने सादर केला. याचे नृत्य दिग्दर्शन तंजावूर नृत्य शाळेच्या संस्थापिका गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू ग्रीष्मा लेले यांनी केले होते. गुरू तेजस्विनी लेले या आचार्य पार्वतीकुमार व गुरू वेणुगोपाल पिल्ले यांच्या शिष्या असून या गुरूद्वयीकडून भरतनाटय़मचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध नर्तक सचिन शंकर यांच्याकडे बॅले या नृत्यप्रकाराचेही शिक्षण घेतले आहे. इटली, स्पेन आणि बल्गेरिया येथील नृत्यमहोत्सवातही तंजावूर नृत्यशाळेच्या चमूला ३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नृत्यशाळेच्या ११ ते १४ वयोगटातील मुलींवर गेले सात-आठ महिने आम्ही मेहनत घेत होतो. सहा दिवस स्पर्धेच्या निमित्ताने इटलीत असताना खूप काही शिकायला मिळाले. आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक नृत्यपारंगत मुलांचे चमू पूर्ण तयारीनिशी तिथे आले होते. ते आपल्या कामाच्या बाबतीत व्यावसायिकता पाळणारे होते. या स्पर्धेत ‘प्रिझर्वेशन ऑफ कल्चर’ हा पुरस्कार मिळाल्यामुळे ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ डान्स’ या स्पर्धेत नृत्य सादरीकरणाची संधी मिळाल्याबद्दल आनंद होत आहे.  – तेजस्विनी लेले