९० टक्के परिसर प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून बाहेर

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीवर करोनाचे पहिले संकट म्हणून पाहिल्या गेलेल्या वरळी कोळीवाडय़ामध्ये आता या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. वाढते संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंद कराव्या लागलेल्या वरळी कोळीवाडय़ात सध्या केवळ १३ सक्रिय रुग्ण असून प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून ९० टक्के परिसर वगळण्यात आला आहे. परिणामी, वरळी कोळीवाडय़ाची करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

वरळी कोळीवाडय़ात मार्चच्या अखेरीस करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सतर्क झालेल्या पालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोळीवाडय़ात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. टाळेबंदी आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली. करोनाबाधितांना रुग्णालयात, तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले. वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे वरळी कोळीवाडय़ातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.

वरळी कोळीवाडय़ात आजघडीला केवळ १३ सक्रिय रुग्ण आहेत. आता केवळ १७ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात असून लवकरच ही ठिकाणेही प्रतिबंधमुक्त होतील, असा आशावाद ‘जी-दक्षिण’ विभागातील साहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी व्यक्त केला. वरळी कोळीवाडय़ाप्रमाणेच जिजामाता नगरमध्येही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोळीवाडा, जनता कॉलनी, आदर्श नगरमध्ये ३७२ रुग्ण होते. त्यापैकी २९९ बरे झाले असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही भाग लक्षात घेता तेथे २२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील १३ सक्रिय रुग्ण वरळी कोळीवाडय़ात आहेत, अशी माहिती शरद उघाडे यांनी दिली.

‘जी-दक्षिण’ विभागात रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांवर

वरळी, परळ, प्रभादेवी आणि आसपासच्या परिसराचा समावेश असलेल्या ‘जी-दक्षिण’ विभागात रुग्णवाढीचा दर १ टक्क्य़ावर आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ७१ दिवसांवर गेला आहे. या भागात एकूण ४ हजार ३२५ पैकी ३ हजार २२१ रुग्ण बरे झाले असून ३२० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आजघडीला ७८४ सक्रिय रुग्ण आहेत.